तरुणांच्या तोंडावर कोणती गाणी आहेत यावरून त्यांच्या देशाचे भवितव्य सांगता येते, अशा आशयाचे विन्स्टन चर्चिलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याच धर्तीवर शिक्षकांची मानसिकता काय आहे यावरून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणक्षेत्राचे भवितव्य सांगता येते. आपापल्या परिघात तळमळीने विविध प्रयोग करून ‘उद्याचे जबाबदार नागरिक’ घडविण्यासाठी आपला ‘आज’ खर्चणारे असंख ‘हाडाचे शिक्षक’ आपल्या आसपास असतात. एरवी अंध:कारमय वाटणाऱ्या जगात या नंदादीपांचा प्रकाश आश्वासक वाटतो. अशाच काही धडपडय़ा शिक्षकांचा हा परिचय

*मेधाविनी नामजोशी या गेली १५ वर्षे वंचित मुलांच्या जीवनकौशल्यासंबंधित विविध उपक्रमांशी संबंधित आहेत. सध्या त्या ‘वाचा’ या संस्थेच्या मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतात. स्त्री पुरुष समानतेसाठी आवश्यक अशी वैचारिक बैठक मांडणे, वंचित मुलींना जीवनकौशल्यांचे शिक्षण देणे, असे या संस्थेच्या कामाचे स्वरूप आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, अत्याचाराला बळी पडू नये म्हणून लहानपणापासून मुलींना सक्षम करणे आणि मुलांना संवेदनशील बनवणे आवश्यक ठरते. याला अनुसरून जीवनकौशल्यांचे शिक्षण वंचित मुलांना देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मुंबई, ठाणे, वलसाड येथील १५ केंद्रांमध्ये ‘वाचा’चे काम चालते. मुंबईत खार, सांताक्रुझ, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी येथील वस्त्या, ठाणे जिल्ह्य़ातील डोंबिवली, कल्याण येथील वस्त्या आणि वलसाड येथील वस्त्यांमध्ये आठवडय़ातून तीनदा प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात.
अगदी डिक्शनरी कशी वाचायची, नकाशा वाचन कसे करावे, रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर कसा पाहावा, महिलांचा डबा खुणांवरून कसा शोधावा, रेल्वेचे तिकीट कसे काढावे, ते कसे पडताळावे, हे ‘वाचा’चे प्रशिक्षक वस्तीतील मुलींना शिकवतात. रुग्णालय, पोलीस स्थानक, टपाल कार्यालय वा इतर सार्वजनिक ठिकाणे यात वावरण्यासाठी आवश्यक ठरणारा आत्मविश्वास मुलींमध्ये यावा, यासाठी अशा ठिकाणी मुलींना नेलं जातं. यासंदर्भात त्यांनी एक अनुभव सांगितला. अंधेरीच्या एका वस्तीत राहणाऱ्या मुलींना जेव्हा रेल्वे स्थानक दाखविण्यास नेले होते. त्या मुलींमधील एकीने तोपर्यंत कधीच रेल्वे स्टेशनही पाहिले नव्हते. रेल्वेच्या कूपन मशीनमधून तिकीट पंचिंग करण्यास सांगितल्यानंतर आलेल्या ‘बीप’ आवाजाने एक मुलगी रडायला लागली. ‘मशीन बिघडल्यामुळे आता पोलीस आपल्याला पकडतील,’ अशी भीती तिला वाटत होती. नजिकच्या भविष्यात घरकाम करणाऱ्या महिलांनाही बेसिक इंग्रजी येणं आवश्यक ठरणार आहे. स्वयंपाकासाठी गॅजेट्स वापरणं, डिजिटल तंत्रज्ञान सामग्रीचा उपयोग करणे या साऱ्याच गोष्टी शिकणं, त्यासंबंधीची इंग्रजीतील माहितीपत्रं वाचता येणं आवश्यक ठरणार आहे. अशा कौशल्यशिक्षणाची गरज हेरून संस्था काम करते. आठवी ते दहावीच्या मुलांना पुढील शिक्षणाच्या वाटा कळाव्यात, कुठल्या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा घेता येईल, त्याची प्रवेशपरीक्षा, येणारा खर्च, शुल्क कसे जमवता येईल, कुठल्या शिष्यवृत्त्या मिळतील, यासंबंधीची माहिती देणारे ‘करिअर फेअर’ही संस्थेतर्फे आयोजित करते. ‘वाचा’ संस्थेच्या १५ नियमित प्रशिक्षक आणि सात ते आठ स्वयंसेवक हे काम पाहतात. मुले अथवा युवकांसंबंधित काम करताना प्रशिक्षकही युवाच असावा, या हेतूने वाचातील प्रशिक्षकही २० ते ३५ वयोगटातल्याच असून सर्वच्या सर्व महिला आहेत. या प्रशिक्षकही अशाच वस्तीतून आल्या असून, परिस्थितीशी झगडून, शिक्षण-प्रशिक्षण घेऊन त्या प्रशिक्षणाचे काम करतात. त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी संस्थेतर्फे वेळेची भरपगारी सवलतही दिली जाते.

* नाटय़ आणि शिल्पकला या माध्यमातून वंचित मुलांच्या क्षमता, जाणिवा विकसित करण्याचं कार्य सचिन गवाणकर करतात. ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर. व्यवसायाने शिल्पकार. शिल्पकला आणि नाटय़कलेचे माध्यम रिमांड होम, अनाथाश्रम, बालिकाश्रम यातील मुलांच्या विकासासाठी उपयोगात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाटय़कलेद्वारे देहबोलीची जाणीव, वक्तृत्वकला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कलांमधून व्यक्त होताना आपल्या समस्यांकडे त्रयस्थपणे पाहायला या मुलांना शिकवणं, त्यावर विचार करायला शिकणं यासंबंधीचे प्रशिक्षण सचिन या वंचित मुलांना देतात. सचिन गवाणकर सांगतात, सोप्या अ‍ॅक्टिव्हिटिजनी सत्रांची सुरुवात होते. त्यामुळे सिरॅमिक क्लेचा गणपती आपणही तयार करू शकतो, ही भावनाच मुळी मुलांना आनंद देणारी आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावणारी असते. ‘सलाम बॉम्बे ट्रस्ट’च्या अंतर्गत कांदिवलीतील वस्त्यांमधील मुलांना सहा महिने नाटय़प्रशिक्षण दिल्यानंतर त्या मुलांनी षण्मुखानंद सभागृहात जो अफलातून परफॉर्मन्स दिला होता, तो आजही आम्हांला आठवतो आणि त्या मुलांनाही! एखादं सत्र संपल्यानंतर ‘फिर कब आओगे?’ हे जेव्हा मुलं आपुलकीने विचारतात, ते निश्चितच समाधान वाढवणारे असते, असेही ते म्हणाले.

* लोकशिक्षणाचा वसा गेली १५ वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या शिल्पाने अत्यंत बिकट परिस्थितीत वाढणाऱ्या कित्येक मुलांना, महिलांना शिक्षणाची प्रकाशवाट दाखवली आहे. वस्त्यांमधील मुले, महिला यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी त्यांना केवळ पुस्तकी शिक्षणच नाही तर व्यावहारिक शिक्षण, आरोग्य, वर्तणुकीचे धडे आणि स्वत:च्या पायावर त्यांना उभं राहता यावं, म्हणून व्यावसायिक शिक्षणाची गोडी लागावी, म्हणून शिल्पा प्रयत्नशील आहे. जीवनकौशल्यांचं शिक्षण देताना कायदेशीर बाबी कशा पडताळाव्यात, संबंधित कागदपत्रे कशी तयार करावीत, बचत कशी करावी, या विषयीची सत्रे ती घेते. महिलांना आपले कायदेशीर अधिकार, सरकारी नियम यांची माहिती ती देते. स्वाक्षरी करायला शिकवते. त्यासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गट, सामाजिक – राजकीय संस्थांच्या कार्यकर्त्यांसाठी शिल्पा प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करते. वंचितांसाठी संवेदनशीलतेने काम कसे करता येईल, यासंबंधीचा दृष्टिकोन निर्मिती, कौशल्य आणि ज्ञानविकास या तिन्ही पातळीवर ती कार्यरत आहे.

* कोल्हापूरच्या स्मिता माटे, सुमेधा कुलकर्णी, विदुला स्वामी, जुई कुलकर्णी या पालक अथवा शिक्षक असलेल्या चौघी गेली सहा वर्षे कोल्हापूरच्या गरीब वस्तींमधील मुलांसाठी ‘खेळघर’ हा उपक्रम राबवतात. राजारामपुरी येथे दोन आणि आर. के. नगरमध्ये एक अशा तीन खेळघरांमधून सुमारे ९० मुलांना जीवनकौशल्यांचं तसेच अनौपचारिक शिक्षणाचे धडे दिले जातात. स्वच्छता राखणं, श्लोकपठण, खेळांद्वारे शिक्षण, नाटुकली, घडीकाम, पुस्तक वाचन, विचार लिहिणे, भाषा, गणित, विज्ञानाचे शिक्षण, शैक्षणिक सहलीअंतर्गत पन्हाळ्याला भेट, सर्कस दाखवणं, अथवा पुण्याच्या मुलांनी सादर केलेला ‘पु.ल. आजोबा’ चा खेळ आवर्जून बघायला जाणं असे शिक्षणेतर उपक्रमही खेळघरातर्फे राबवला जातो. या उपक्रमाबद्दल सांगताना स्मिता माटे म्हणाल्या की, या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात स्वारस्य असतं. विविध संस्कार केंद्रांच्या एकत्रित गॅदरिंगमध्ये आम्हांला कुठलीही कल्पना न देता आमच्या मुलांनी ‘खेळघर’मध्ये आल्याने आमच्यात कुठला बदल झाला, या आशयाचे सादर केलेले पथनाटय़ मनाला खूपच समाधान देणारे होते.
मूल पोटात असतं तेव्हापासूनच मातेचे संस्कार सुरू असतात. मूल जन्मल्यावरही त्याला चालायला, बोलायला शिकवणारी आई हीच मुलाची पहिली शिक्षक असते. शिक्षणाचं क्षेत्र आज अनेक गैरप्रकारांनी आणि गोंधळांनी काळवंडलं आहे, तरी पुढील पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत, या हेतूने शिक्षकी पेशाला व्रत म्हणून आचरणारे अनेक शिक्षक आजही आहेत. आईच्याच कळकळीनं ते मुलांना घडवत आहेत.
आजच्या मातृदिनाचा आणि शिक्षक दिनाचा योग साधून या गुरू-माऊलीला आमचे प्रणाम आणि शुभेच्छा..