शालेय शिक्षण विभागातंर्गत खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेस होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांचे पगार ऑनलाइनव्दारे करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने दिली आहे.
ऑनलाइन व्दारे शालेय प्रणाली अंतर्गत पगार होण्याकरिता तीन महिन्यापासून सातत्याने जिल्हा परिषदेतंर्गत वेतन पथकामार्फत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यातील २१०२ शिक्षकांचे पगार ऑनलाइनव्दारे करण्याचे काम पूर्ण झाले असून वेतन पथकाचे अधीक्षक रामनाथ कचरे, योगेश सोनवणे, शरद चव्हाण, लिपीक पंडित शेलार व मुख्याध्यापक अविनाश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांनी त्यासाठी परीश्रम घेतले. त्यानिमित्त महासंघाच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला. खासगी प्राथमिक शाळांचे २००४-०५ या वर्षांचे वेतनेत्तर अनुदान शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांचे मानांकन तपासून विशेष शिबीराव्दारे वेतनेतर अनुदानाचे मूल्यांकन केले. ११३ शाळांचे वेतनेत्तर अनुदान ९५ लाख रूपये ऑनलाइनव्दारे वर्ग करण्यात आले. शिक्षणाधिकाऱ्यांसह लिपीक दिनेश टोपले व पाटोळे यांनी विशेष परीश्रम घेतले. लवकरच शाळांच्या मूल्यांकनाची छाननी करण्यात येणार असल्याचे मोगल यांनी सांगितले. मोगल यांची भेट घेतलेल्या महासंघाच्या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष रमेश अहिरे, जिल्हा सचिव नंदलाल धांडे आदी उपस्थित होते.