शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्याकडे शिक्षक आपल्या विविध मागण्या घेऊन जात असतात मात्र त्यांच्या तक्रारीची ते दखल घेत नसल्यामुळे शिक्षकांवर होणारा हा अन्याय बघता नेहमी संयमी आणि शांततेने एखादा विषय मांडणारे शिक्षक आमदार नागो गाणार चांगलेच संतापले आणि त्यांनी शिक्षक दिनाच्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या परिसरात शिक्षकांच्या समोरच नेताम यांचे वाभाडे काढले.
जिल्ह्य़ात ४५० खासगी अनुदानित शाळा आहेत. नेताम यांनी काही शाळांची मान्यता रद्द केली. खरे तर मान्यता काढण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना नाही. मात्र नेताम यांनी शिक्षण संचालकाच्या आदेशाने मान्यता काढल्याचे सांगतले. यावर गाणार यांनी संचालकाचे पत्र मागितले असता त्यांनी पत्र न दाखविता मौखिक आदेश दिल्याचे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपूर खंडपीठाने ५ जुलै २०१३ व ८ ऑगस्ट २०१२३ च्या निर्णयानुसार पटपडताळीत ५० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी अनुपस्थित असणाऱ्या शाळांची मान्यता पूवर्वत करण्यात आली आहे. परंतु शिक्षणाधिकारी यांनी न्यायालयाचा आदेशाला जुमानत नाही. जवळपास ४० शाळांची मान्यता काढली असून गेल्या सहा महिन्यापासून शिक्षकांना पगार नाही. त्यामुळे शिक्षकदिनी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर जवळपास तीन तास निदर्शने केली. नेताम यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यावे यासाठी त्यांच्याकडे निरोप पाठविले मात्र एका कणचाऱ्याने ते बाहेर गेले असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात नेताम आपल्या कक्षात बसले होते. आंदोलन करणाऱ्यांनी शिक्षक आमदार नागो गाणार यांना फोन करून माहिती दिली असताना गाणार जिल्हा परिषदेमध्ये आले.
गाणार यांनी नेताम यांच्याविषयी संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांना मौद्याला गेले असल्याचे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार सुरू असताना गाणार चांगलेच संतापले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि नेताम आंदोलनकर्त्यांसमोर आले.
गाणार यांनी नेताम यांच्यावर निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. मात्र नेताम काहीच उत्तर देत नसल्यामुळे गाणार यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेत सर्व शिक्षकांच्या समोर चांगलेच वाभाडे काढले. शिक्षकांच्या प्रश्नासंदभर्ाीत भेटायला आलो तर कक्षात राहत नाही. कक्षात आल्यानंतर प्रवेशद्वारा जवळ असलेले कर्मचारी साहेब नाही म्हणून सांगतात. मग भेटायचे कुठे. रात्रीच्यावेळी तुम्ही बारमध्ये
असता असा का, असा प्रश्न गाणार यांनी विचारला. बारमध्ये भेटायला यायचे असेल तेथेही येऊ असा हल्लाबोल केल्यावर नेताम मात्र गाणार यांच्यासमोर निरुत्तर झाले. असे अधिकारी शिक्षकांच्या जीवनाशी खेळ करीत असल्याचा आरोप करीत अशा अशांना ताबडतोब हाकलले पाहिजे असा संताप व्यक्त करून नागो तेथून निघाले.