व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ‘खडू व फळा बंद’ आंदोलनात शिक्षक आमदार नागो गाणार आणि समाजकल्याण अधिकारी यांनी हस्तक्षेप केल्याने तूर्तास आंदोलन थांबले असले तरी येत्या आठ दिवसानंतर ते पुन्हा चिघळण्याची शक्यता बळावली आहे. एकीकडे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या शिरजोरीविरोधात दंड थोपटले आहेत तर दुसरीकडे व्यवस्थापनानेही परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शंकरनगरातील मूक आणि बधीर औद्योगिक संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून आठ जानेवारीला खडू व फळा बंद आंदोलन पुकारले होते. असंख्य विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी टिळक पत्रकार भवन गाठले व आपबिती सांगितली. अध्यक्ष आनंद गोडे आणि सचिव दिलीप गोडे यांनी गैरमार्गाने संस्थेवर कब्जा केला असून गोडे बंधू शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्गाशी सूडबुद्धिने व्यवहार करतात. व्यवस्थापन शिक्षक व कर्मचाऱ्यांवर पैशासाठी दबाव आणतात. केबीनमध्ये बोलावून कपिल वासे यांच्याकडून तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे वासे यांना धक्का बसला आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. अगोदरच लाखो रुपये भरल्याने आता कुठून पैसे आणायचे, असा प्रश्न वासे यांना पडला आणि त्यांना आत्महत्येचा पर्याय शाळेच्या प्रार्थनेच्यावेळी बोलून दाखवला. इतर शिक्षकांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करून खडू व फळा बंद आंदोलन करून व्यवस्थापनाच्या आरेरावीचा निषेध केला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. सचिव शिक्षकांकडे कामासाठी वारंवार पैशाची मागणी करतात. तुम्हाला शासनाकडून खूप पगार मिळतो त्यातील हिस्सा आम्हाला द्या, असे त्यांचे म्हणणे असल्याचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सेवा ज्येष्ठता यादीत गैरप्रकार करण्यात आले. शिक्षकांना सुट्टय़ा असताना त्या मंजूर न करता पैसे कापले जातात, शाळेचे ग्रंथपाल हेमंत करडभाजणे यांच्यावर खोटे आरोप लावून ७५ हजाराची थकबाकी काढली आहे, श्रीनिवास हरिदास व हेमंत कराडभाजणे यांची नियमबाह्य़ वेतनवाढ थांबवण्यात आली आहे, अनिल लुटे व देवीदास हेलोंडे यांना पदोन्नतीपासून मुद्दाम वंचित करण्यात आले आल्याचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुलींच्या वसतिगृहाची सबब पुढे करून ३० वर्षांपासून राहणाऱ्या माधव वैद्य यांना क्वार्टरमधून बाहेर काढले आणि ती जागा गो.म. खोडे मुकबधिर विना अनुदानित विद्यालयाचे प्राचार्य धवल व्यास यांना राहयला दिली. भाडय़ाची रक्कम सचिव घेत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. संस्थेचे अध्यक्ष आनंद गोडे धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोकरी करतात. त्यामुळेच दिलीप गोडे यांची शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याची हिंमत वाढली आहे. म्हणूनच ताबडतोब गोडे यांचे व्यवस्थापन बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक नेमावा, अशी एकमुखी मागणी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आहे.
दिलीप गोडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सर्व आरोपांचे खंडन केले. न सांगता सुट्टया घेणाऱ्यांवर कारवाई करणे गैर कसे ठरू शकते, असा सवाल त्यांनी केला. ग्रंथालयात ५०० पुस्तके आढळून आलेली नाहीत त्यामुळे ग्रंथपालांना दोषी धरले आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत हितापेक्षा शाळेची भरभराट करावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र काम टाळून एका शिक्षिकेने मुलाच्या अभ्यासासाठी वैद्यकीय रजा टाकली तर दुसरी दीड महिना अमेरिकेत राहून आली. त्यांच्या विरोधात कारवाई केली. भारतीय विद्या भवनच्या शिक्षकांना १५ हजारच्यावर पगार मिळत नाही तरी ते चांगला निकाल आणतात मात्र, आमच्या शिक्षकांना ४० हजार रुपये पगार मिळतो तरी ते काहीच करीत नाहीत.
तीच गत कर्मचारी व ग्रंथपालाची आहे. या सर्वावर शासनाचा सव्वा कोटी रुपये खर्च पगाराच्या रूपात होतो. त्यांनी तसे आऊटपुटही शाळेला द्यावे एवढीच आमची इच्छा आहे.
दोन व्यवस्थापनामधील भांडणाचा लाभ हे लोक घेत असून शिक्षक व कर्मचारी आधीच्या व्यवस्थापनाच्या बाजूने आहेत. त्यांनी ट्रिब्युनल किंवा कोर्टात जायला हवे होते.
मात्र, परवानगी न घेता व मागण्यांचे निवेदन न देता मुलांना हाताशी धरून त्यांनी आंदोलन सुरू केले ते चुकीचे आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.