जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीमुळे १ नोव्हेंबरपूर्वी मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा ऐन दिवाळीत शिक्षकांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने दिला आहे.
संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की सरकारच्या धोरणानुसार माध्यमिक शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०१३ पासून शालार्थ वेतन प्रणाली (ऑनलाइन) सुरू केली जाणार आहे. परंतु पेन्शन योजनेतील न्यायालयीन निर्णय, कार्यालयातील अपुरा कुशल कर्मचारीवर्ग, नेटवर्कमधील अडथळे, शाळा कर्मचारी व शाळांची माहिती भरण्यातील त्रुटी यामुळे ही प्रणाली सुरू होण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या परिस्थितीत दिवाळीपूर्वी वेतन ऑनलाइन होणे केवळ अशक्य आहे.
ही कार्यवाही पूर्ण होईपर्यंत शाळांकडून जुन्याच पद्धतीने वेतन देयके मागवून ऑक्टोबरचे वेतन दि. २५ पूर्वी शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करावे, त्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही कारवी, असे संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव गुंड, सचिव शंकर भारस्कर, शिक्षकेतर संघाचे समशेर पठाण, भाऊसाहेब थोटे आदींनी निवेदनात म्हटले आहे.
ऑनलाइन वेतन प्रणालीसाठी राज्यातील पुण्यासह ४ जिल्हे निवडले गेले होते, परंतु पाच महिन्यांनंतरही पुणे जिल्हय़ातील ७० टक्के शाळांचेच वेतन ऑनलाइन होऊ शकले, आता नगरसह उर्वरित जिल्हय़ांसाठी ऑनलाइन प्रणाली राबवण्याचे सरकारचे आदेश आहेत, पूर्ण कार्यवाही होईपर्यंत जुन्याच पद्धतीने वेतन देणे सुरू ठेवावे, असे आवाहन संघाने केले आहे.