महिन्यापासून जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदलीचे राजकारण गाजत असून, बदलीसाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे मनधरणी करणाऱ्या काही शिक्षकांच्या प्रयत्नांना यश आले, तर काहींना मात्र नाराज व्हावे लागल्याचे दिसत आहे. जिल्ह्य़ातील ९० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अंतर्गत बदलीसाठी जिल्हा परिषदेकडे २०५ शिक्षकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ९० शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यात अमळनेर तालुक्यातील २४ शिक्षकांचा समावेश आहे. २०११-१२ मध्ये शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या होत्या. घरापासून शाळा जवळ असावी, शाळेत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दूरच्या अंतरामुळे जाण्यायेण्यात वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळते, अशी कारणे देत शिक्षकांनी बदलीसाठी संघटनेच्या माध्यमातून, तर काहींनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधण्याची धडपड सुरू केली होती. चोपडा तालुक्यातून १३ शिक्षक, धरणगाव तालुक्यातून चार, पारोळ्यातून पाच तर चाळीसगावमधून दोन शिक्षकांची बदली अमळनेर तालुक्यात करण्यात आली आहे.