सामाजिक, आर्थिक व जातनिहाय २०११ची जनगणना महानगरातील शिक्षकांमार्फत करण्यात आली होती. ही जनगणना होऊन चार वर्षे पूर्ण झाली. याकरिता ज्या शिक्षकांना प्रगणक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर्स म्हणून नियुक्त केले होते, त्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. त्यांच्या कार्याचे पूर्ण मानधन त्यांना वेळेच्या आत मिळाले नाही. प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर्स यांना जनगणनेचे मानधन तात्काळ अदा करण्याची व्यवस्था करावी, मानधन तात्काळ न मिळाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल, असे निवेदन शासनाला देण्यात आले आहे.
प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर्स यांना पूर्ण मानधन मिळावे याकरिता संघटनेतर्फे अनेकवेळा निवेदने देण्यात आली. दिलेल्या सर्वच निवेदनांची दखल शासनाने न घेतल्यामुळे संघटनेला तीनवेळा धरणे आंदोलन करावे लागले. या आंदोलनांचा परिणाम म्हणजे प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर्स आदी कर्मचाऱ्यांना अध्रे मानधन दिले गेले.
मात्र, अजूनही पूर्ण मानधन त्यांना मिळालेले नाही. याचा पाठपुरावा करण्याकरिता आमदार नागो गाणार यांनी प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर्स यांना तात्काळ मानधन देण्यात यावे, याकरिता पत्रव्यवहार केला. तसेच विधान परिषदेत प्रश्न लावून धरला. तरीसुद्धा प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर्स यांना महापालिकेने जनगणनेचे मानधन देण्यास टाळाटाळ केली.
निवेदन देताना आमदार नागो गाणार, शहर कार्यवाह सुभाष गोतमारे, कार्याध्यक्ष तुलाराम मेश्राम, सुधीर वारकर, अरुण गायकवाड, बंडू तिजारे, योगराज ढेंगे, शेंदरे तसेच कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.