19 January 2021

News Flash

‘शाळा बंद’ आंदोलनाचा विदर्भात पूर्णपणे फज्जा

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य पातळीवर पुकारलेले शाळा बंद आंदोलन विदर्भात पूर्णत फसले.

| January 14, 2015 08:03 am

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य पातळीवर पुकारलेले शाळा बंद आंदोलन विदर्भात पूर्णत फसले. राज्य पातळीवर आंदोलन जाहीर केले असले तरी विदर्भातील शिक्षक संघटनांना विश्वासात घेतल्यामुळे या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केल्यानंतर मुख्यध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या संघटनांनी एकत्र येऊन विविध न्याय मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले. मात्र, राज्यात काही भागात प्रतिसाद मिळाला असला तरी विदर्भात मात्र शाळा बंद आंदोलन पूर्णत फसले. एरवी शिक्षक संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा करीत असते. त्यावेळी विदर्भातील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होतात. मात्र, कुठल्याही संघटनेचा प्रभाव आंदोलनात दिसून आला नाही. सकाळी नेहमीप्रमाणे जिल्ह्य़ातील सर्व शाळा सुरू असून अनेक शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना बंदची माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे शिक्षक नेहमीप्रमाणे वेळेवर शाळेत आल्यामुळे दिवसभर शाळा सुरू होत्या. अनेक शाळांना बंदबाबत सूचना नसल्यामुळे त्यांनी बंदकडे दुर्लक्ष केले.
नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विदर्भातील विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांना आश्वासन देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या शिक्षकांच्या समायोजना संदर्भात शिक्षण संस्थाचालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीचा २३ ऑक्टोबर २०१३ चा आकृतीबंध रद्द करून चिपळूणकर समितीच्या शिफारशीनुसार पदभरती करावी, माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान व त्याचा २००४ पासूनचा फरक देण्यात यावा, खासगी माध्यमिक शाळांनाही राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि सर्वशिक्षा अभियानाचा निधी मिळावा, कायम विनाअनुदानित व विनाअनुदानित शाळा व वर्गाना विना अट अनुदान देण्यात यावे, पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी स्वतंत्र मुख्याध्यापक नियुक्त करावा, पहिली ते आठवीच्या वर्गासाठी कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करावी इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदमध्ये विदर्भातील कुठल्याही शैक्षणिक संघटना सहभागी झालेल्या दिसून आल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी योगेश बन यांना विचारणा केली असता त्यांनी शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.
शिक्षण संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी रवींद्र फडणवीस यांनी सांगितले, संस्थाचालकांची संघटनेला या संपाबाबत विश्वासात घेण्यात आले नाही. पुण्या मुंबईच्या काही शिक्षक संघटनांनी बंदचा निर्णय घेतला असला तरी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना त्याची काही माहिती देण्यात आली नाही. विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थाचे बंद आहे का म्हणून दूरध्वनी आले. मात्र, राज्य पातळीवरून विदर्भातील पदाधिकाऱ्यांना कुठलेही आदेश नसल्यामुळे संस्थाचालकांची संघटना यात सहभागी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यापेक्षा शिक्षक संघटनांशी चर्चा करून मागण्यांबाबत विचार करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 8:03 am

Web Title: teachers strike totally fail in maharashtra
Next Stories
1 शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय निधीअभावी रखडले
2 चौकशीत दोषी आढळली तरच ‘एसएनडीएल’वर कारवाई – बावनकुळे
3 उपराजधानीला गरज चांगल्या कलादालनांची!
Just Now!
X