शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबरोबर शिक्षकांची अनावश्यक प्रशिक्षणे कमी करण्याचा विचार करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नूतन प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीच्या वतीने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी माने म्हणाले, की शिक्षण हक्क कायद्याची पूर्णत: अंमलबजावणी नजीकच्या काळात करण्यात येणार असून, वर्गातील सर्व म्हणजे तीसही मुलांची प्रगती होण्यासाठी शिक्षकांना आपला जास्तीतजास्त वेळ शाळेमध्ये घालवता यावा म्हणून शिक्षकांची अनावश्यक प्रशिक्षणे कमी करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी निवडणुकीची फक्त मतदानप्रक्रियेची कामे आणि जनगणनेची प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचीच काम द्यावीत, यासाठी निर्देश दिले जाणार असल्याची माहितीही माने यांनी दिली.    या वेळी विभागीय अध्यक्ष महादेव डावरे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार शहराध्यक्ष पी. एस. घाटगे यांनी मानले. या सत्कारप्रसंगी एस. एस. पाटील, महिला आघाडी प्रमुख नंदिनी पाटील, राज्य सचिव शिवाजी भोसले, निर्मला पाटील, बालिशा लंबे, शिवाजी सोनाळकर, सूर्यकांत बरगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.