नागपूर जिल्ह्य़ातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन आता राष्ट्रीयीकृत बँकेतून होणार आहे. नागपूर जिल्ह्य़ातील अनुदानित माध्यमिक शाळेतील वेतन नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेला कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता ३१ मार्च २०१३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्र बँकेने गेल्यावर्षी २६ डिसेंबरलाच दिले होते. मात्र, गेल्या ३१ मार्चपर्यंत बँक तशी सुविधा पुरवू शकली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच आणखी चार महिन्याची मुदत बँकेने मागितली. त्या दरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विधिमंडळासमोर आंदोलन करून नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेतून वेतन मिळावे अशी मागणी केली होती. वर्धा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून होत असल्याचे त्यांनी उदाहरणही दिले. शिवाय नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्यापुढे गेल्याच महिन्यात आंदोलन करून पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच व्हावा, असा आग्रह धरला.
काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील शिक्षण संचालकांनी शिक्षकांच्या वेतनासाठी युनियन बँक ऑफ इंडियाची शिफारस शालेय शिक्षण खात्याकडे केली होती. मुंबईतील अनुदानित शाळांचे वेतन याच बँकेतून होते. त्यामुळे नागपुरातही याच बँकेद्वारे शिक्षकांना वेतन मिळण्याचा मार्ग खुला झाल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.