आयआयटी म्हटल्यावर संशोधकांची फौज डोळ्यासमोर येते. पण असे अनेक संशोधक आहेत जे कुठे तरी आपआपल्या परीने संशोधन करत असतात. अशा संशोधकांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयआयटी मुंबईने ‘टेकफेस्ट’च्या निमित्ताने एका खुल्या संशोधन स्पध्रेचे आयोजन केले आहे. यातील विजेत्यांना तब्बल ७० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
जानेवारीत रंगणाऱ्या ‘टेकफेस्ट’मध्ये कुरुओसिओ नावाची संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही  स्पर्धा व्यक्ती व संघ अशा सर्वासाठी खुली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने वाहतूक क्षेत्रात काहीतरी संशोधन करणे अपेक्षित आहे. देशात सध्या वाहतुकीची मोठी समस्या भेडसावते आहे. त्यावर काहीतरी ठोस उपाय तयार व्हावा यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल, असे आयोजकांना वाटते. याचबरोबर आरोग्य सुविधेवर काही उपाय आणि भन्नाट कल्पना असतील तर त्याचीही तुम्ही या स्पध्रेत मांडू शकतात. ग्राहकपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टेलिकॉम क्षेत्रातील संशोधनालाही या स्पध्रेत स्थान देण्यात आले आहे. या स्पध्रेत सहभागी होताना मात्रकेवळ कागदावरचा किंवा कल्पनेतला आराखडा सादर करून चालणार नाही तर त्याचा वापर कसा होऊ शकतो याची चित्रफीतही सादर करावी लागणार आहे. या स्पध्रेची पहिली फेरी १४ डिसेंबर रोजी पार पडणार आहे तर निवडक संशोधकांसाठी दुसरी फेरी ३० डिसेंबर रोजी होईल. यात सहभागी होण्यासाठी  competitions@techfest.org  या ई-मेल आयडीवर तुमच्या संशोधनाचा संक्षिप्त अहवाल आणि त्याचे चित्रीकरण पाठवा. आयआयटी खडकपूरचा टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापन महोत्सव ‘क्षितीज’मध्येही यंदा विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील संशोधन प्रकल्पांसाठी राष्ट्रीय स्तरावरची संधी देण्यात येणार आहे. जानेवारी अखेरीस होणाऱ्या या महोत्सवासाठी विविध स्पर्धा आत्तापासून सुरू झाल्या आहेत.