महावितरणमधील तांत्रिक कर्मचाऱ्यांना वीज देयके वाटप करण्याचे काम सोपविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापुढील काळात देयके वाटपाचे काम करणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतली आहे. ग्राहकांचे तक्रार निवारण करणे, थकबाकीदारांकडून देयक वसुली करणे, नवीन वीज जोडणी व मीटर बसविणे आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. असे असताना महावितरणने तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतांत्रिक कामे देऊन अन्याय केला आहे. यापूर्वी अशा प्रकारचे सहकार्य कर्मचाऱ्यांनी केले होते. सातत्याने हे काम लादले गेल्यास ती कामे केली जाणार नाहीत, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनेचे सतीश म्हात्रे, मागासवर्गीय विद्युत संघटनेचे सुभाष सावंत यांनी वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.