दुष्काळग्रस्त गावांमध्ये टँकर मंजुरीचे अधिकार आता तालुका स्तरावर तहसिलदारांना व छावणीचे अधिकार गाव पातळीवर ग्रामपंचायतींना देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. धरणांमधून पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्याचेही त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी त्यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढाव्यासंदर्भात बोलवलेली अधिकाऱ्यांची बैठक कार्यकर्त्यांनीच ताब्यात घेतली. प्रामुख्याने जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याविरूध्द कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. निम्म्या-अध्र्या तालुक्यांचीच जुजबी माहिती मंत्र्यांनी घेतली, त्यातही एका तालुक्याच्या वाटय़ाला काही सेकंद आले. प्रत्येक प्रश्नावर ‘जिल्हाधिकारी लक्ष घालतील’ असे सांगत कदम यांनी ही बैठक गुंडाळली. कार्यकत्यरंनी प्रशासनाबद्दल तक्रारी केल्यानंतरही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता-अग्रवाल, आमदार चंद्रशेखर घुले, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे आदी उपस्थित होते. कुकडी व गोदावरी कालव्यांच्या पाण्याबाबत त्या, त्या भागातून मोठय़ा तक्रारी करण्यात आल्या, मात्र या खात्याचे कोणतेच अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. याबद्दल कदम यांनी सबंधितांकडून खुलासा मागवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.   
जिल्हाधिकारी कार्यालायातील बैठक मुळातच तासभर विलंबाने सुरू झाली. मंत्री कदम यांच्याबरोबर कार्यकर्तेच मोठय़ा संख्येने आल्याने मुळ गोष्टी बाजूला राहिल्या, राजकीय तक्रारीच मोठय़ा प्रमाणावर झाल्या. प्रामुख्याने पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे आंगुली निर्देश करीत श्रीगोंदे, नगर व पारनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुष्काळातील राजकीय मोर्चेबांधणीचा पाढा वाचला. काँग्रेसच्या बाजूने मतदान झालेल्या गावांमध्ये पाण्यापासून, छावणी, चारा, रोहयोची कामे अशा सर्वच गोष्टींची अडचण केली जाते अशा स्वरूपाच्या तक्रारी नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा आदींनी केल्या. कुकडीचे आवर्तन सुरू असताना अशा गावांमधील तलाव भरून दिले जात नाही अशा तक्रारी करण्यात आल्या. नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी अशा तक्रारींना समर्थन देत जनगणनेच्या नावाखाली दुष्काळ निवारणात प्रशासनाकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.
पाण्याच्या प्रश्नावर अशा गोष्टी होत असतील तर ही गंभीर बाब आहे एवढेच भाष्य करीत कदम यांनी लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली, तसेच याबाबतचा अहवाल पाठवण्यास सांगितले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी दुष्काळ निवारणाबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. ग्रामपंचायतींनी जनावरांच्या छावण्या सुरू केल्यास त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही, दहा लोकांनी एकत्र येऊन काम मागितले तरी ते सुरू केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. दुष्काळ निवारणात कोणतेही राजकारण आणले जाणार नाही असे सांगतानाच या कामाला पैसेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
 बैठकस्थळी शॉर्टसर्किट
कदम यांची बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच नियोजन भवनात शॉर्टसर्किट होऊन सभागृहातील सर्व विद्युत उपकरणे बंदी पडली. अधिकारी व कार्यकर्त्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या या सभागृहात त्यामुळे बसणेही मुश्कील झाले. नंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत नगर येथे गेल्या वेळच्या बैठकीलाही वीजपुरवठा खंडित झाला होता अशी आठवण करून दिली. आपत्ती व्यवस्थानाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही असे ते म्हणाले.