स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कलांगण आणि नृत्यश्री यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नृत्याविष्कारातून ‘तेजोमय तेजोनिधी’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार उलगडले गेले. सावरकर यांच्या काव्य रचनांवर आधारित या कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर निष्ठा असलेले अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते.
सावरकर यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती, हे हिंदूनृसिंहा प्रभो शिवाजी राजा, सागरा प्राण तळमळला, शतजन्म शोधिताना, जयोस्तुते आणि अन्य काही काव्यरचनांवर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. भरतनाटय़म नृत्यांगना धनश्री आपटे, चैत्राली आठवले, ऐश्वर्या सासनुर, नपूर कुलकर्णी, जुई कुलकर्णी, सायली रायबागकर आदी या नृत्याविष्कारात सहभागी झाल्या होत्या. या गाण्यांचे संगीत वर्षां भावे यांचे तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी भावे यांनी केले.
या वेळी बोलताना धनश्री आपटे यांनी सांगितले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार थेट हृदयाला भिडतो. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम करण्याची कल्पना सुचली. तर अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवाचून देशापुढे अन्य कोणताही पर्याय नाही.  विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.