तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ लवकरच पवईतील ‘इंडियन इस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) हिरवळीवर रंगणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतून तयार झालेल्या या यांत्रिक करामती ६ ऑक्टोबरला मुंबईकरांना अनुभवता येणार आहेत.
आयआयटीचा टेकफेस्ट हा तंत्र महोत्सव हे त्याचे निमित्त. टेकफेस्टमधील सर्वाधिक आकर्षणाचा व चर्चेचा विषय असलेल्या रोबोटिक्स स्पर्धेसाठीची नोंदणी सुरू झाली आहे. या स्पर्धेची मुंबई विभागीय स्तरावर होणारी प्राथमिक फेरी ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. या फेरीतून तीन उत्कृष्ट निर्मिती जानेवारी, २०१४मध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होतील.
भौतिकशास्त्रातील साध्या नियमांचा वापर करून असाधारण निर्मिती करण्याचे आव्हान या स्पर्धेत असते. विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चमू ही यंत्रे तयार करतात. या यंत्रामध्ये असलेली चढाओढ यांत्रिक करामतींबरोबरच युद्धातील रोमांचकतेचाही अनुभव देणारी ठरते. त्यामुळे, विद्यार्थ्यांबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञानात रुची असलेल्यांचाही प्रतिसाद टेकफेस्टला लाभतो.
‘आयआयटी’ने १९९८ला सुरू झालेला टेकफेस्ट हा विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाबरोबरच निर्मिती व वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारा देशातील सर्वाधिक मोठा तंत्र महोत्सव म्हणून ओळखला जातो. यंदा ३ ते ५ जानेवारी, २०१४ दरम्यान पवईतील आयआयटीच्या हिरवळीवर टेकफेस्ट रंगणार आहे. या वर्षीच्या टेकफेस्टला युनेस्को आणि युनिसेफचेही पाठबळ लाभले आहे.
विविध स्पर्धा, प्रदर्शने, मान्यवरांची व्याख्याने यांच्याबरोबरीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आव्हान देणारी रोबोटीक्स स्पर्धा हे दरवर्षी टेकफेस्टचे आकर्षण असते. टेकफेस्टच्या विविध स्पर्धामध्ये बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट करता येते. दरवर्षी टेकफेस्टच्या तब्बल १५० विविध स्पर्धामधून ३० हजाराहून अधिक भारतीय व परदेशी विद्यार्थी सहभागी होतात. तर एक लाखांहून अधिक विद्यार्थी टेकफेस्टमध्ये या ना त्या निमित्ताने सहभागी होतात. यंदा टेकफेस्टच्या विविध स्पर्धासाठी ठेवण्यात आलेल्या बक्षीसांची रक्कम ३० लाखांहून अधिक आहे. या वर्षी ग्रीड वॉरिअर, अ‍ॅपेक्सो आणि कोडस्ट्रक या तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
‘कॅसिओपिअन वॉर’ म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन स्तरावर होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबईसह नॉएडा, इंदूर, हैदराबाद आणि भुवनेश्वर या विभागांमध्ये होईल. मुंबईत ६ ऑक्टोबरला प्राथमिक फेरी पार पडणार आहे. मुंबईतून निवडल्या जाणाऱ्या तीन चमूंना ३ ते ५ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होता येईल. विजेत्यांना तब्बल अडीच लाख रुपयांच्या बक्षीसांची लयलूट या स्पर्धेत करता येणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क – http://www.techfest.org