शहरातील विविध पोलीस ठाण्यातील चौकीतील बंद असलेल्या दूरध्वनीचे बिल भरल्यानंतर अखेर शुक्रवारी दूरध्वनी सुरू झाले. मात्र, अद्याप दूरध्वनी नसलेल्या चौक्यांमध्ये दूरध्वनी बसविण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील पोलीस चौक्या आणि काही पोलीस ठाण्याचे दूरध्वनी बिल न भरल्यामुळे बंद असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने मंगळवारी दिले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तालयाकडून तत्काळ बंद दूरध्वनीचे बिल गुरूवारी भरण्यात आले. त्यानंतर बंद असलेले दूरध्वनी सुरू झाले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पैसे न आल्यामुळे दूरध्वनीचे बिल भरले गेलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांना दैनंदिन काम करताना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, शहरातील सोळापेक्षा जास्त चौक्यांना अद्यापही दूरध्वनी क्रमांक नाहीत. याबाबत प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुर रेहमान यांनी सांगितले की, बिल न भरल्यामुळे बंद असलेले दूरध्वनी सुरू करण्याला आमचे प्राधान्य होते.  बिल भरण्यात आल्यानंतर हे दूरध्वनी सुरू झाले आहेत. ज्या चौक्यांना अद्याप दूरध्वनी आलेले नाहीत, त्याबाबत लवकरच उपाययोजना केल्या जातील.