दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून कलाकार हे घराघरांमध्ये पोहोचतात. मालिकेतील कलाकाराची एखादी भूमिका इतकी लोकप्रिय होते, की तो कलाकार मालिकेतील ‘त्या’ भूमिकेच्या नावाने ओळखला जातो. कलाकारांच्या या लोकप्रियतेचा फायदा नाटकाला करून घेण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. त्याचा परिणाम आणि कलाकारांच्या रंगभूमीवर काम करण्याच्या इच्छेतून मालिकांमधील काही चेहरे रंगभूमीवर दिसायला लागले आहेत.
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर नाव मिळाले की कलाकार चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांकडे वळत असत. आता मालिकांमधील लोकप्रिय चेहरे रंगभूमीवर काही नव्या तर काही पुनरुज्जीवित नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीकडे वळताना दिसत आहेत. अर्थात काही कलाकार आवर्जून मालिकांमधून काम करीत असले तरीही वेळात वेळ काढून रंगभूमीवर नाटक करीत असतात.
दूरचित्रवाहिन्यांवरील अनेक मालिकांमध्ये प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. या दोघींच्या प्रमुख भूमिका असलेले ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. याच नाटकाच्या निमित्ताने अनेक मालिकांचे दिग्दर्शन करणारा वीरेंद्र प्रधान हा दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर आला आहे.
‘राधा ही बावरी’ मालिकेतील ‘राधा’ अर्थात श्रुती मराठे हिची प्रमुख भूमिका असलेले ‘लग्नबंबाळ’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘श्री’ अर्थात शशांक केतकर याने ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाद्वारे पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. विविध मालिकांमधून प्रेक्षकांना परिचित झालेले अभिनेते अशोक शिंदे यांनीही दीर्घ कालावधीनंतर ‘प्रेम, प्रेम असतं’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केले आहे.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकांमधील स्वप्निल जोशी हा लोकप्रिय चेहरा. मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातूनही तो ‘गेट वेल सून’चे प्रयोग करतो आहे. या नाटकाची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. ‘कॉमेडीकिंग’ सागर कारंडे व भारत गणेशखुरे ‘जस्ट हलकंफुलकं’ नाटक करीत आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते शरद पोंक्षे, चिन्मय मांडलेकर, हृषीकेश जोशी, अश्विनी एकबोटे, डॉ. अमोल कोल्हे, आदिती सारंगधर, अभिजित केळकर, भरत जाधव, रिमा, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री आदी कलाकारही मालिका, चित्रपट सांभाळून नाटक करीत आहेत.