सराफी दुकान बंद करून घरी परतणाऱ्या सराफाच्या डोळयात मिरचीची पुड टाकून सहा लाख रूपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरटयांनी लांबविले. आज सायंकाळी सातच्या सुमारास पारनेर-सुपे रस्त्यावर संभाजीनगर परिसरात ही घटना घडली.
पारनेर शहरातील दत्तोबा खुंटावर विलास विष्णूपंत शहाणे (वय ५०) यांचे वैभव ज्येलर्स या नावाने सराफी दुकान आहे. सायंकाळी दुकान बंद करून मोपेडवरून ते घरी निघाले असता वीज उपकेंद्रासमोर एक इंडिका (क्रमांक ६२१४) त्यांना अडवी आली. या मोटारीच्या धक्क्यानेच शहाणे मोपेडवरून खाली पडले. ते पडताच या मोटारीतील तिघा-चौघांनी खाली उतरून त्यांच्याशी झटापट केली व डोळयात मिरचीची पुड टाकली. अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरलेल्या शहाणे यांच्या जवळील चांदीचे १० किलो दागिने असलेली पिशवी हिसकाऊन चोरटे या मोटारीतूनच सुप्याच्या दिशेने पळून गेले.
घटना घडताच आजूबाजूचे लोक जमले. पोलिसांना कळवल्यानंतर पारनेरचे उपनिरीक्षक विकास सोमवंशी, सुपे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मारूती मुळूक यांनी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. उशिरापर्यत ती सुरूच होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहाणे यांच्या दुकानात एक संशयीत वारंवार येत होता. घटना घडली त्यावेळी ती व्यक्ती शहाणे यांनी ओळखल्याची अनधिकृत माहिती आहे. घटनेनंतर पारनेर पासून जवळच असलेल्या गावात त्याच्या शोधासाठी शहाणे त्या गावाकडे रवाना झाले होते. उशिरापर्यंत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.