पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गहीरे होत असून एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४७ पैकी १० लघु प्रकल्प कोरडेठाक पडल्याने जिल्हा प्रशासनासमोरील संकट वाढले आहे. सद्यस्थितीत नकाणे आणि तापी नदीचा उद्भव येथून शहरवासीयांची तहान भागविली जात आहे.
सोनवद वगळता नऊ मध्यम प्रकल्पांपैकी बुराई, करवंद आणि अनेर या प्रकल्पांमध्येच समाधानकारक पाणी शिल्लक आहे. तापीवरील सारंगखेडा, प्रकाशा व सुलवाडे या तीनही प्रकल्पांमध्ये १२१.९८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४,३०७ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. शहरात सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. सोनवद वगळता जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याची टक्केवारी पाहिल्यास वास्तव लक्षात येईल. पांझरा प्रकल्प १४ टक्के, मालनगाव १६, जामखेडी पाच, कनोली पाच, बुराई २४, करवंद ३०, अनेर ५०, रंगावली (नंदुरबार) चार व नकाणे तलावात २७ टक्के पाणी उपलब्ध आहे. ४७ लघूप्रकल्पांपैकी शिरपूर तालुक्यातील रोहिणी, वाडी, साक्री तालुक्यातील बेहेड, ककाणी, कायंकळा व शेवाळी, शिंदखेडा तालुक्यातील मेथी हे दहा प्रकल्प कोरडे पडले आहेत. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पात ६८५ दशलक्ष घनफूट पाणी असून तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजमध्ये ५२, सुलवाडे ५५ तर प्रकाशा बॅरेजमध्ये ६१ टक्के पाणी उपलब्ध आहे.
एप्रिलच्या प्रारंभी दहा लघु प्रकल्प कोरडे पडल्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. यंदा कधी नव्हे, अशा दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. काही प्रकल्पांमध्ये पाच ते १५ टक्क्यांपर्यंत पाणी शिल्लक असल्याने कोरडे पडणाऱ्या प्रकल्पांची संख्या पुढील काळात वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धुळे शहरात सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज बांधून नियोजन करणे क्रमप्राप्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. नाशिक जिल्ह्यात शेकडो गावांना टँकरने पाणी द्यावे लागते. जळगावमध्येही टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी आहे. धुळे जिल्ह्यात आगामी काळात काही गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो की काय, असे एकंदर चित्र आहे.