News Flash

ठाण्यातील महिला बँकेची दशकपूर्ती..!

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार मंगळवारी मुंबईत भारतातील पहिल्या सार्वजनिक महिला बँकेचा शुभारंभ करण्यात आला असला तरी ठाण्यात ‘शताब्दी महिला सहकारी बँक’ दहा वर्षांपूर्वीपासून कार्यान्वित

| November 22, 2013 08:17 am

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार मंगळवारी मुंबईत भारतातील पहिल्या सार्वजनिक महिला बँकेचा शुभारंभ करण्यात आला असला तरी ठाण्यात ‘शताब्दी महिला सहकारी बँक’ दहा वर्षांपूर्वीपासून कार्यान्वित आहे. कष्टकरी महिलांना अल्प उत्पन्नामुळे  कर्जपुरवठय़ासारख्या सुविधेपासून वंचित राहावे लागत होते. या महिला बँकेने त्यांना मदतीचा हात दिला. कष्टकरी महिलांना या बँकेने कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील साडेपाच हजारांहून अधिक महिला या बँकेच्या खातेदार तर साडेतीन हजारहून अधिक  महिला भागधारक आहेत.
शहरातील १५ सुशिक्षित महिलांनी एकत्र येऊन ‘लेडिज नेटवर्क वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून कष्टकरी महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा उपक्रम सुरू केला होता. विविध प्रदर्शनांतून या महिलांना बाजारपेठ उपलब्ध झाली असली तरी त्यांच्या अल्पउत्पन्नामुळे सामान्य बँका त्यांना कर्ज देण्यास मात्र नकार देत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी संस्थेने महिला बँकेची संकल्पना भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेसमोर मांडली. रिझव्‍‌र्ह बँकेनेही या उपक्रमास पाठिंबा देत एक कोटींची ठेव जमा करत महिला बँक सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार मध्यवर्ती बँकेमध्ये एक कोटीची अनामत रक्कम भरून ७ नोव्हेंबर २००३ साली ठाण्यामध्ये महिला सहकारी बँकेचा शुभारंभ झाला.
महिलांसाठी सुरू झालेली ही बँक चालवणारे संचालक मंडळ, व्यवस्थापक, बँकेचा कर्मचारी वर्ग सर्वच महिलाच आहेत. या बँकेने  आर्थिक दृष्टय़ा मागास, घरकाम करणाऱ्या, अंगणवाडी-बालवाडी सेविका, पोळीभाजी केंद्र चालवणाऱ्या महिलांवर लक्ष्य केंद्रीत केले. त्यामुळे या महिलांसाठी ही बँक मुख्य आधार ठरू लागली. ‘महिला उत्कर्ष बचतगट योजना’ ही या बँकेची सर्वात लोकप्रिय योजना ठरली. आता कमी पगार असलेल्या महिलांसाठी कर्ज मिळवण्याचे हक्काचे ठिकाण असा बँकेचा लौकिक आहे.
बँकेच्या माध्यमातून दीडशे महिला बचत गट कार्यरत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या या बँकेने १ कोटीहून १४ कोटीपर्यंतचा अनामत रक्कमेचा पल्ला गाठला आहे. इतर बँकांप्रमाणेच आधुनिकतेची कास धरत आकर्षक व्याजदर, लॉकर्स सुविधा, संगणकीकृत बँकिंग, सोन्यावर कर्ज पुरवठा आणि १२ तास सेवा या सुविधा बँकेने दिल्या आहेत. ठाणे महापालिका कार्यक्षेत्र असलेली ही बँक लवकर आपले कार्यक्षेत्र ठाणे जिल्हाभर विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे.
अन्य महिला बँकाना मदत मिळावी..
 महाराष्ट्रामध्ये २५ महिला सहकारी बँका कार्यरत आहेत. सार्वजनिक क्षेत्रात आलेल्या नव्या बँकेने या महिला बँकांना मदत केल्यास महिला अर्थिक सक्षमीकरणाचे ध्येय नक्कीच यशस्वी होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बँकेच्या अध्यक्षा कल्पना हजारे यांनी या निमित्ताने दिली आहे.  
महिला बँकेचे फायदे आणि तोटे
महिला बँक असल्याने महिला या बँकेशी आपुलकीने वागतात. बँकेची तात्काळ मदत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याने कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीत महिला या बँकेला पहिले प्राधान्य देत असतात. घेतलेल्या कर्जाची परतफेडही त्या प्रामाणिकपणाने करतात. महिलांसाठी बँक असली तरी या बँकेत पुरुष ठेवीदारही गुंतवणूक करू शकतात. असे असले तरी पुरुष ठेवीदार बँकेकडे पाठ फिरवतात. त्याचा परिणाम बँकेच्या ठेवींवर होतो. त्यात पूर्णवेळ व्यवसायिक महिलांची संख्या कमी असल्याने इतर बँकांच्या तुलनेत या बँकेमध्ये गुंतवणूक कमी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:17 am

Web Title: ten years completed to women bank in thane
टॅग : Thane News
Next Stories
1 कल्याण डोंबिवलीतील चुकीची पाणी बिले रद्द
2 पवार फेसबुक प्रकरण, पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह
3 महापालिका किंवा तीन नगरपालिका..!
Just Now!
X