हदगाव तालुक्याच्या तामसा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जैन मंदिरातून भगवान महावीरांची मूर्ती चोरीला गेल्याच्या प्रकारानंतर शनिवारी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने तणाव निवळला. हदगाव तालुक्यात तामसा येथे मध्यवस्तीत हे मंदिर आहे. या मंदिरातून सुमारे एक लाख रुपये किमतीची भगवान महावीरांची मूर्ती चोरटय़ांनी लांबविली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण त्याच वेळी आठवडी बाजारात काहींनी त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोन समाजात तणाव निर्माण झाला. आठवडी बाजार असल्याने त्यात आणखीच भर पडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सौम्य छडीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. मूर्ती चोरीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तामसा येथे राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात केली आहे.