कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाची १० दिवसांपासून दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली. रस्त्यावर लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी लाठीहल्ला अथवा इतर कारवाई करू नये, म्हणून आंदोलकांनी चक्क सामूहिक राष्ट्रगीत म्हणणे सुरू केले. मात्र, यानंतरही पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, लाठीमाराच्या वेळी सतीश शिंदे, उज्वला लक्कड, गजानन देशमुख, नंदकुमार लाटे हे जखमी झाल्याचे आंदोलकांनी संध्याकाळी उशिरा सांगितले. गेल्या १० दिवसांपासून ५ महिने अनुदानावर असलेल्या शाळांना तत्काळ १० महिने अनुदान मंजूर करावे, अंशकालीन निदेशकांकरून पूर्ण वेळ काम करून घेतले जाते किमान त्यांना ५ हजार रुपये मानधन द्यावे, नियुक्त केलेल्या शिक्षकांना पहिली ते आठवीचा कार्यभार द्यावा, भरतीबाबतची पटसंख्येची अट शिथील करावी आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी ५ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले. यातील काहींची प्रकृती खालावल्याने आंदोलक चांगलेच चिडले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यास ते दुपारी कार्यालयात गेले, काही आंदोलकांनी रस्त्यावरच लोटांगण घातले. सरकारविरोधात घोषणाबाजीही  केली. त्यांना अडविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर पोलिसांचा अधिक बंदोबस्त मागविण्यात आला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष जगदीश डांगे, उपाध्यक्ष राज सोनावणे यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.