किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणामुळे तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे मध्यरात्रीपर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या सहाजणांना न्यायालयात दाखल केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
शहरातील गांधी पार्क भागात रात्री साडेआठच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा धक्का लागल्यावरून कुरबूर झाली. त्यावरून वाद पुन्हा पेटला. पाहता पाहता या भांडणाला दोन गटांचे स्वरूप आले. दोन्ही बाजूंनी शस्त्रेही बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी लगोलग गांधी पार्क परिसरात धाव घेतली. या वेळी परिसरात पोलिसांच्या गर्दीनेच वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. रात्री दहाच्या सुमारास अक्षरश: छावणीचे स्वरूप आले होते. एका गटाने प्रल्हाद शहाणे यांना मारहाण केली. त्यामुळे तणाव वाढला. आमदार संजय जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी नानल पेठ पोलीस ठाण्यात जमाव बराच काळ ठाण मांडून होता. शहाणे यांच्या फिर्यादीवरून जफारखान, जमील, इकबाल, एहसानखान व अन्य दहा आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. जखमी शहाणे व अन्य एक साथीदार यांना सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात विरोधी गटाचे जफारखान मोहसीनखान यांच्या फिर्यादीवरून शहाणे यांच्यासह अजय, विजय, सुशील या चौघांवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीतील आरोपींपैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यात जावेद खान इसाक खान, शेख नूर, सय्यद सोहेल सय्यद कादर, अब्दुल हफीज अ. गणी, साजेद खान पठाण, जाफर मोमीन खान पठाण यांचा समावेश आहे.