नवी मुंबई महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेत दिघा, ऐरोली, गोठिवली परिसरांत तणावाचे वातावरण होते. शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तुरळक बाचाबाची झाल्याचे प्रकार येथे घडले. त्यामुळे वातावरण काही काळ गंभीर झाले होते. ऐरोली व दिघा परिसरात मतदान केद्रांच्या बाहेरील दुकाने आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. तेथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप मतदान केंद्राला प्राप्त झाले होते.
सकाळपासून सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते परिसरातील मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करत होते. काही उमेदवारांनी आपल्या मदतीसाठी ठाणे येथून कार्यकर्त्यांची फौज मागविली होती. कार्यकर्त्यांचा ताफा आणि वृत्तवाहिन्या व सोशल मीडियावर येणाऱ्या तुरळक हाणामारीच्या वृत्तांनी नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचा परिणाम मतदानावर झाला.
सकाळी काही अंशी कामावर जाणाऱ्या मतदारांनी मतदान करण्याचा वेग धरला होता. मात्र मारामारीच्या घटनांच्या अफवा पसरल्याने मतदारांची संख्या रोडवल्याचे दिसले. मतदारांची नावे मतदार यादीत न आल्याने नागरिकदेखील त्रस्त झाले होते. परंतु राजकीय पक्षांनी आपल्या कुटुंबासमवेत शांततेत मतदानाचा हक्क बजावला
ऐरोली परिसरात शिवसेनेचे उमेदवार एम.के.मढवी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांना गस्त वाढवावी लागली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. ऐरोलीत-दिघा परिसरात राजकीय नेत्यांनी ठाणे आणि कल्याण परिसरांतून कार्यकर्त्यांचा फौजफाटा आयात केल्याने पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. तळवली-गोठिवली भागातही राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळकृष्ण पाटील आणि काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे यांच्यात मतदार यादीवरून खडाजंगी झाली. बाळकृष्ण पाटील यांनी मद्यप्राशन करून मतदान केंद्रावर धाव घेतल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी वाशी येथे रुग्णालयात नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोठिवली येथे बोगस मतदार पावत्या वाटप करण्यात आल्या.
या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार संगीता पाटील यांच्या प्रभागात सोसायटय़ांमधील नावे इतरत्र गेल्याने भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ऐरवी संवेदनशील म्हणून चिंचपाडा व ऐरोली परिसर आज दुपापर्यंत पूर्णता शांततामय वातावरणात मतदान प्रक्रियेत सहभागी झाला होता.

नावे वगळण्यात आल्याने मतदार संतापले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत असलेली नावे नव्या प्रारूप रचनेनुसार नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीत गायब झाली होती.  तर काही नावे इतरत्र दाखल झाल्याने मतदारानी संताप व्यक्त केला. काही ठिकाणी मतदार यादीत नाव न आढळल्याने दुसऱ्या मतदान केद्रांवर जाऊन आपले नाव शोधावे लागले. तर अनेकांना मतदार यादीत चुका आढळून आल्याने त्यांना नाव शोधण्यास कठीण गेले त्यामुळे  उमेदवारांना त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली.