वर्षभरापूर्वी जरीपटक्यातील एका बेकरीवरून दोन गटात झालेला वाद सोमवारी पुन्हा उफाळून आला. परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
राकेश उधमदास गुरबानी (रा. साई वसंतशहा मंदिराजवळ, जरीपटका) यांची तेथेच शिवशक्ती बेकरी आहे. कैलास बांबोळे, प्रमोद भागचंदानी व शेखर पाटील यांनी मार्च २०१२मध्ये या बेकरीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे केली होती. हे तिघेही सोमवारी दुपारी दोन वाजतच्या सुमारास बेकरीसमोर आले आणि त्यांनी दीड लाखाची खंडणी मागितली व ती दिली नाही तर पुन्हा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून बेकरी बंद करण्याची धमकी दिली, अशी तक्रार राकेश गुरबानी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी कैलास बांबोळे, प्रमोद भागचंदानी व शेखर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
वसंतशहा चौकात चहा घेण्यासाठी गेले असताना आरोपी राकेश गुरबानी, प्रकाश जगवानी, राजकुमार सचदेव, चंद्रराम साधवानी, संतोषकुमार आडवानी व इतर ८ ते १२ साथीदारांनी ‘तुने मेरे बेकरीके खिलाफ महाराष्ट्र प्रदूषण मंडल को तक्रार क्यू दिया, तु क्या हमारी दुकान बंद करेगा’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली तसेच अंगावर रॉकेल ओतून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार कैलास नारायण बांबोळे (रा. नवीन इंदोरा) यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राकेश गुरबानी, प्रकाश जगवानी, राजकुमार सचदेव, चंद्रराम साधवानी, संतोषकुमार आडवानी व इतर ८ ते १२ साथीदारांविरुद्ध  अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा नोंदवला.