कागल येथे शिवाजी महाराजांच्या पोस्टरची विटंबना करण्याचा प्रकार समाजकंटकांकडून घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याचे पडसाद कागल शहरात उमटले. शिवप्रेमी संघटनांकडून कागल बंदचे आवाहन करण्यात आले. त्याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यानंतर पोलिस ठाणे ते बसस्थानक या मार्गावर निषेध फेरी काढण्यात आली. संतप्त लोकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाडय़ा रोखून दगडफेक केली. यानंतर दोन ट्रक व एक एसटी बसेसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगविले.
येत्या रविवारी पारंपरिक शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल फलक कागल शहरात लावले आहेत. खर्डेकर चौकातील हायमास्क लॅम्पला ४ फूट बाय २० फूट आकाराचा फलक
लावण्यात आला आहे. गुरूवारी रात्री सर्फराज हुसेन नाईक, वैभव दिनकर हेगडे व अमोल आवळे या तिघांनी या फलकावर ठोसे मारले. ही घटना समजल्यावर अमित नाईक, गौरव नाईक, सुहास गुरव, सौरभ पाटील, सागर भुरले या युवकांनी तिघांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी दुरूत्तरे दिली. याची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनाही त्रिकुटांनी, तुम्हाला काय करायचे ते करा, असे दुरूत्तर दिले. समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी रातोरात तिघांनाही अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी शिवप्रेमी संघटनांनी कागल बंदचे आयोजन केले होते. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवप्रेमी नागरिकांनी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलिस ठाण्यासमोर येऊन आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना हद्दपार करावे, अशा मागण्या करण्यास सुरूवात केली. त्यांची गाढवावरून िधड काढण्यासाठी तीन गाढवे पोलिस ठाण्यात आणण्यात आली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस उपअधीक्षक महेश सावंत यांनी कारवाईचे आश्वासन देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
यानंतर पोलिस ठाणे ते बसस्थानक मार्गावर निषेधफेरी काढण्यात आली. फेरी बसस्थानकात आल्यानंतर काही तरूण जवळच असलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गेले. त्यांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये कागल आगाराची एसटी बस व दोन ट्रकच्या काचा फोडल्या. पोलिस अधीक्षक सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. यानंतर पो.नि.रमेश बनकर, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, कागल नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने खर्डेकर चौक येथे शिवाजी महाराजांचा फलक उंच ठिकाणी बांधला. यामुळे वातावरण निवळण्यास मदत झाली.