News Flash

खुनानंतर कोल्हापुरात तणाव

पाचगाव येथील माजी सरपंच अशोक पाटील यांच्या खुनानंतर कोल्हापूर परिसरात काल रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री पाटील यांच्या खून प्रकरणी गृहराज्यमंत्री

| February 14, 2013 09:07 am

पाचगाव येथील माजी सरपंच अशोक पाटील यांच्या खुनानंतर कोल्हापूर परिसरात काल रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री पाटील यांच्या खून प्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत पाटील समर्थकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात दगडफेक व रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान आज तणावपूर्ण वातावरणात अशोक पाटील यांच्या पार्थिवावर पाचगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.
 पाचगाव येथील आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक अशोक पाटील यांचा येथे काल दुपारी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले असता ते मृत पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तथापि पाटील यांच्या मारेक ऱ्यांना ताब्यात घेतले जात नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत पाटील समर्थकांनी इस्पितळ परिसरातच आक्रमक भूमिका घेतली. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इस्पितळ परिसरातील पोलीस चौकी व एस.टी.डी. बूथवर दगडफेक करण्यात आली. या मध्यवर्ती ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रात्री उशिरा कामगारमंत्री हसन मुश्रीफ इस्पितळात आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते एकाचवेळी बोलू लागल्याने त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटे तीन वाजता फिर्याद दाखल करण्यात आली, तेव्हा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख करण्यावरून वादावादी झाली. कार्यकर्ते याच मागणीसाठी आडून राहिले होते. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी आरोपी कोणीही असला तरी तपासानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे मान्य केले.   
दरम्यान गुरुवारी दुपारी पाचगाव येथे पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी निघालेल्या अंत्ययात्रेत आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश होता. गावातील व्यवहारबंद असले तरी तणावपूर्ण शांतता होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 9:07 am

Web Title: tension in kolhapur after murder
Next Stories
1 पाणी न देता शरद पवारांचे दुष्काळग्रस्तांसाठी खोटे अश्रू
2 पाटील खुनावरून आरोप-प्रत्यारोप
3 यशवंतरावांच्या कार्याचा अभ्यास अखंड सुरू ठेवा- रावसाहेब शिंदे
Just Now!
X