नागपूर शहराला दहशतवादी आणि नक्षलवाद्यांपासून सदोदित धोका असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच उपराजधानीचे नागपूर शहर किती सुरक्षित, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ सुरक्षा यंत्रणाच नव्हे तर प्रशासनासह नागरिकांनीही अधिक सजग राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
दीक्षाभूमी तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ, झिरो माईल्स, लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र जीआरसी, रिझव्‍‌र्ह बँक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, विधान भवन ही महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये आदींमुळे नागपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. नागपूर शहराला दहशतवादी आणि नक्षलवाद्यांपासून सदोदित धोका असल्याचे लपून राहिलेले नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमा नागपूर शहरापासून फार दूर नाहीत. मध्यप्रदेश सीमेवर देशी कट्टे वा इतर शस्त्रांची अवैध विक्री होते, रेल्वे वा रस्ते मार्गाने अंमली पदार्थाची तस्करी होते, बांगला देशी नागरिक सहजपणे नागपुरात येतात, राहतात. त्यांना भारतीयत्वाचे पुरावे तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला गेल्याचे उघड झाले आहे. याची जाण असूनही पोलिसी कारवाई नगण्यच आहे.
शहराच्या सीमेवर अमरावती, काटोल, कोराडी, कामठी, कळमना, भंडारा, उमरेड, हुडकेश्वर, बेसा, वर्धा, हिंगणा आदी जकात नाक्यांवर पोलीस असले तरी प्रत्यक्षात ते काय करतात, हे नागरिकही जाणतात. शहरात येण्यासाठी पळवाटा भरपूर असून तेथून कुणीही सहजपणे शहरात प्रवेश घेऊ शकतो.
रस्त्यांवर तैनात पोलिसी नजर ‘अर्थ’पूर्ण असल्याचेही नागरिक जाणतात. सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने सीसी टीव्ही कॅमरे लावलेले नाहीत. काही दुकाने वा खासगी प्रतिष्ठानांचा अपवाद सोडला तर सीसी कॅमेरे न लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
नागपूर शहर सुरक्षित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते सर्व प्रयत्न केले जातात. बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच स्फोटके शोधण्यात तरबेज श्वान पथक, सशस्त्र कमाडोंची तुकडी चोवीसही तास सज्ज असते. दिवस-रात्र पोलिसांची गस्त असते. गैरप्रकार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होतेच. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण कमीच आहे. सुरक्षेसाठी इतरही यंत्रणा, पोलीस व नागरिकांनीही सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवले तरी पुरेसे आहे. नागरिकांची ‘मला काय त्याचे’ प्रवृत्ती असेल तर शहर सुरक्षित राहणार कसे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ सुरक्षा यंत्रणाच नव्हे तर प्रशासन व जनतेलाही अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर २००४ मध्ये दोन ठिकाणी दहशतवाद्यांकरवी पाईपबॉम्ब पेरण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. नागरिक व सुरक्षा यंत्रणा सजग असल्याने हा प्रकार वेळीच उघड झाला आणि हे बॉम्ब महत्प्रयासाने नष्ट करण्यात आले. त्यानंतर स्फोटकांनी खचाखच भरलेल्या लाल दिव्याच्या अ‍ॅम्बेसेडरमध्ये ३० जून २००६ रोजी पहाटे पोलिसांच्या गणवेषात संघ मुख्यालयावर चाल करू पाहणाऱ्या तीन दहशतवाद्यांना पोलिसांच्या सजग पथकाने पाठलाग करीत मुख्यालयाच्या काही पावले आधीच टिपले. नागपुरात स्फोट घडवून आणण्याचे दहशतवाद्यांचे दोन्ही प्रयत्न सपेशल फसले. सिमी या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे नागपूर शहरात असल्याचे उघड झाले. सिमीच्या काही पदाधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. नागपूर शहराच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा बंदुका तयार करण्याचा गुप्त कारखाना पोलिसांनी काही वर्षांपूर्वी उघडकीस आणला. तेव्हा काही नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात आली होती.