वाडी नाक्याच्या बाहेर व्यापार करणारे स्थानिक कराची चोरी करीत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या एलबीटी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे वाडी नाक्याजवळ एलबीटी विभागाने अभियान तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून एका विशेष पथकाची निर्मिती करण्याची योजना आहे.
वाडी नाका, आजूबाजूने जाणाऱ्या गाडय़ा, रेल्वेस्थानक याकडे विशेष लक्ष ठेवून गाडय़ांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची कामे विभाग करणार आहे. त्यासाठी एक विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. एलबीटी विभागाने हिवाळी अधिवेशनाच्या एका आठवडय़ापूर्वी तपासणी मोहीम बंद केली होती. परिणामी अधिवेशनाच्या काळात एलबीटी जमा करण्याच्या कामावर त्याचा परिणाम दिसून आला.
एलबीटी विभाग अधिवेशन संपल्यानंतर सक्रिय झाला आहे. एलबीटी विभागाने अधिवेशनाच्या काळात जकात नाक्यावर लक्ष ठेवण्याचे काम केले. काही व्यापाऱ्यांनी वाडी परिसरात गोदाम तयार केले असल्याची माहिती मिळाली. थोडासा माल गाडय़ांमधून भरून नेऊन शहरात शोरूममधून विक्री होत असल्याचे कळले. जकात नाके बंद झाल्यामुळे त्यांची तपासणी होत नाही.याचा फायदा व्यापारी घेत होते. एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी सांगितले, वाडी नाका आणि रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष ठेवण्याची योजना तयार करण्यात आली आहे. याच नाक्यावरून मोठय़ा प्रमाणात माल शहरात आणण्यात येऊन मालाची विक्री होत आहे. मात्र, खरेदीची नोंद कुठेच होत नाही. यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे.
 आतापर्यंत डिसेंबर महिन्यात २७ कोटी रुपये विभागाला मिळाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले एलबीटीमध्ये तूट आली आहे. हे भरून काढण्यासाठी विभागातर्फे मोहीम राबविण्यात येईल. एलबीटीपासून २३३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या वर्षी जकात नाक्यापासून ३४४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे एलबीटी विभागावर ही रक्कम भरून काढण्यासाठी दबाव येत आहे.