महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने भावी शिक्षकांच्या पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगून १० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी एकजण शिक्षक आहे. त्यातील दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हिंगोली व वसमत येथील २१ परीक्षा केंद्रांवर ‘टीईटी’च्या परीक्षेत सुमारे साडेसात हजार परीक्षार्थी बसले होते. परीक्षेपूर्वी सकाळी राजू शिवाजी सानप यांने फिर्याद दिली की, प्रदीप लहूजी भुत्तेकर (रा. देगाव, ता. रिसोड), मधुकर देवराव शिंदे (शिक्षक भारत महाविद्यालय रिसोड) व पांडुरंग एस कोकरे पुणे यांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका देतो, असे सांगून दहा हजार रुपये घेतले. प्रश्नपत्रिका मिळाली नसल्याने आरोपी राजू याने फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्रदीप भुत्तेकर व मधुकर शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, एक प्रिंटर, इंडिका वाहन ताब्यात घेतले असून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पांडुरंग कोकरे फरार झाला आहे.