महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी बुधवारी कराड तहसील कचेरीवर मोर्चा काढून थाळी नाद आंदोलन केले. विविध जिल्हय़ांमधून आलेल्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबोहर ठिय्या आंदोलनास मनाई केल्यामुळे हजारांवर अंगणवाडी सेविकांनी तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
हातात स्टीलची थाळी आणि चमचा घेतलेल्या अंगणवाडी सेविकांनी जोरदार थाळीनाद करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. तहसीलदार कार्यालयाबाहेर झालेल्या सभेत बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ म्हणाल्या, राज्यात सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका आहेत. मात्र, त्यांना अतिशय अल्प मानधन मिळते. वार्षिक वेतनवाढ मिळत नाही. त्यांना महागाई भत्ता, निवृत्ती वेतन, ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना लागू करण्यात आलेली नाही. गेल्या ३६ वर्षांत केवळ सातवेळा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. यावेळी प्रल्हाद देशमाने, दत्ता जगताप उपस्थित होते.