ठाणे-बेलापूर महामार्गावर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून तयार करण्यात आलेला सुमारे पाच किलोमीटर अंतराचा अंतर्गत रस्ता जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात १७ जुलै रोजी वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या रस्त्यामुळे एमआयडीसी भागात जाणाऱ्या वाहनांना सिग्नलचा सामना करावा लागणार नाही. सध्या घणसोलीपर्यंत मर्यादित असणारा हा रस्ता पुढे दिघा एमआयडीसीपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.
ठाणे-बेलापूर महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर दिघा, रबाळे, तळवली, घणसोली, महापे या जंक्शनवर हमखास वाहतूक कोंडी होत आहे. त्याला पर्याय म्हणून खैरणे ते रबाळे या ४.८ किलोमीटर अंतराच्या सव्‍‌र्हिस रोडची बांधणी पालिकेने गेल्या एक वर्षांपासून हाती घेतली आहे. ती आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. महापे येथील एका वर्तमानपत्राने आपल्या छापखान्याची भिंत कमी करून या रस्त्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. ते काम सध्या सुरू असून येत्या दोन आठवडय़ांत ते पूर्ण होणार आहे. याशिवाय खैरणे येथील पालकमंत्री गणेश नाईक यांच्या व्हाइट हाऊसजवळ एक अडथळा बाकी असून तो मोकळा केल्यानंतर या मार्गावरून एमआयडीसी भागात जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामावर सुमारे २९ कोटी रुपये खर्च झाले असून या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यानंतर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तेथे या रस्त्याचा विस्तार केला जाईल, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी स्पष्ट केले.
ठाणे-बेलापूर मार्गावर तीन उड्डाणपुलांची एमएमआरडीए उभारणी करणार
ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि गावांच्या वेशीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून पालिकेने तीन उड्डाणपुलांची निर्मिती करण्याचे ठरविले होते, पण यावर जास्त खर्च होणार असल्याने या शहरावर काहीही खर्च न करणाऱ्या एमएमआरडीएने उड्डाणपुलांची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एमएमआरडीएच्या अभियंता विभागाने या पुलांच्या जागांची पाहणी केल्याचे समजते. तळवली, घणसोली, रबाळे येथे हे पूल बांधण्यात येणार आहेत.