ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पगार देता येईल की नाही, इतकी महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे पाहून मला धक्काच बसला आहे. कारण मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिका आर्थिकदृष्टय़ा मजबूत असल्याचा माझा समज होता, असे ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त करीत यापुढे करवसुलीत हयगय सहन केली जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिला.
सोमवारी महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संजीव जैयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी काटेकोरपणे करवसुली आणि उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यावर भर असेल. तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असे स्पष्ट करीत आपले प्राधान्य आर्थिक शिस्तीला असेल, असे त्यांनी या वेळी सांगितले. मला काम झेपत नसेल तर मी येथून बदली करून घेईन, असेही ते म्हणाले. आर्थिक वर्ष संपण्याकरिता अडीच महिने शिल्लकअसतानाही महापालिकेच्या तिजोरीत बजेटमध्ये अपेक्षित असलेले ४४ टक्के उत्पन्न जमा झालेले नाही. तसेच ठाण्यासारख्या मोठय़ा शहरातून ३८० कोटी रुपयांचे उत्पन्न मालमत्ता करातून मिळते, हे व्यवहार्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक संस्था कर रद्द होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत या कराची काटेकोरपणे वसुली झाली पाहिजे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यकाळाचा विचार करून काम करायचे नाही. कारण त्यामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटते आणि पुढे येणाऱ्या अधिकाऱ्याला ती व्यवस्थित करण्याचे काम करावे लागते. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडणार नाही, यासाठी वास्तवदर्शी काम करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.