ठाणे शहराला खेटूनच असलेल्या भिवंडीतील नव्या गृहप्रकल्पांना गेल्या वर्षीच्या प्रदर्शनात व्यासपीठ खुले करणाऱ्या एमसीएचआय-क्रेडाय या विकासकांच्या संघटनेने यंदा अंबरनाथ-बदलापूर शहरांकडे मोर्चा वळविला आहे. या दोन्ही शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात नव्या इमारती उभारण्याचे काम सुरू असून या इमारतीमधील घरांचा पर्याय नागरिकांपुढे ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. ठाण्यातील बिल्डरांच्या पुढाकाराने येत्या १६ ते १९ जानेवारी दरम्यान भरविण्यात येणाऱ्या मालमत्ता प्रदर्शानात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील शंभरहून अधिक बिल्डरांचे स्टॉल असणार आहेत.  यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील शंभरहून अधिक बिल्डरांचे स्टॉल असणार आहेत. या प्रदर्शनाकरिता ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मोफत प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरज परमार यांनी दिली. अंबरनाथ-बदलापूर शहराही अशाचप्रकारे मोठे गृहप्रकल्प उभे राहत असून ही दोन्ही शहरे रेल्वेच्या माध्यमातून ठाणे-मुंबई तसेच नवी मुंबई शहरांना जोडलेली आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीकोनातून अनेकजण या शहरांमधील गृह प्रकल्पांकडे वळू लागली आहेत. याच पाश्र्वभूमीवर या दोन्ही शहरातील गृह प्रकल्पांतील घरांचा नवा पर्याय बिल्डर संघटनेने यंदाच्या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिले आहेत.