ठाण्याचा महापौर ठरविताना कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका कांचन चिंदरकर यांनी केलेले उघड बंड येथील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा निश्चित असतानाही चिंदरकर यांनी शिवसेनेचरणी वाहिलेल्या निष्ठेमागे आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित दडल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कांचन यांचे पती बाळा चिंदरकर हे काँग्रेसचे बंडखोर नेते रवींद्र फाटक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेत कमालीची चुरस रंगली असून या ‘सुरक्षित’ मतदारसंघात वर्णी लागावी यासाठी स्वत: फाटकही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विजयात फाटकांची भूमिका निर्णायक ठरली, असे भासविण्यासाठी गरज नसतानाही चिंदरकरबाईंनी शिवसेनेला मतदान करून स्वतवर पक्षांतरबंदी कायद्याचे गंडांतर ओढवून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे.
विशेष म्हणजे, महापौर निवडणुकीत जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा फाटकांचा करिष्मा कसा निर्णायक ठरला, अशा स्वरूपाच्या बातम्या छापून याव्यात यासाठी शहरातील एका तथाकथीत पत्रकाराने बुधवारपासून बडय़ा वर्तमानपत्रांसाठी सुरू केलेली ‘पॅकेज’पेरणीचे खमंग किस्सेही मोठय़ा चवीने चर्चिले जात आहेत.
राजन विचारे यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवसेनेत कमालिची चुरस निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सर्वात सुरक्षीत असा मानला जातो. त्यामुळे काहीही झाले तरी हा मतदारसंघ पदरात पाडून घ्यायचा यादृष्टीने इच्छुकांनी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या या मतदारसंघात शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, अनंत तरे अशा तिघांची नावे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांनाही ऐनवेळेस येथून निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. स्वत शिंदे मात्र कोपरी-पाचपाखाडी हा हक्काचा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. या मतदारसंघातून महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास पक्के मानले जात होते.
मात्र, नारायण राणे समर्थक रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश करून म्हस्के यांचा रक्तदाब वाढविला. याच मतदारसंघातून इच्छुक असलेल्या पक्षातील एका बडय़ा नेत्याने तर सध्या ‘लोकमता’चा आधार घेत स्वतच्या नावाची पॅकेजपेरणीही सुरु केल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी झालेल्या महापौर निवडणुकीत कँाग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या विजयासाठी केलेले जीवाचे रान चर्चेचा केंद्रिबदू ठरले आहे.

गरज नसतानाचे बंड
रवींद्र फाटक यांच्या बंडामुळे बुधवारी महापौर निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार हे तर निश्चित मानले जात होते. स्वत: फाटक आणि त्यांच्या नगरसेविका पत्नीने यापूर्वीच पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेसाठी विजयाचे गणित सोपे झाले होते. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक आघाडीला मतदान करणार नाहीत हे स्पष्ट होते. असे असतानाही फाटक समर्थक नगरसेविका कांचन चिंदरकर यांनी उघडपणे बंड करत शिवसेनेला मतदान केले. गरज नसतानाही हे बंड केले गेल्यामुळे चिंदरकर यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकतो. हे ठाऊक असल्याने त्यांनी मतदान करून लागलीच नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ केला. तरीही या कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई झाली तर त्याच्यावर सहा वर्ष निवडणूक लढविण्याची बंदी येऊ शकते. त्यामुळे आमदारकीच्या उमेदवारीसाठी नगरसेविकेचा बळी गेल्याचे आता बोलले जात आहे.
यासंबंधी कांचन चिंदरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण स्वतच्या इच्छेनुसार शिवसेनेला मतदान केल्याचे सांगितले. शिवसेनेच्या विजयात माझे योगदान असावे अशी माझी इच्छा होती. पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो याची कल्पना होती. तरीही शिवसेनेच्या विजयासाठी आपण हे मतदान केल्याचे चिंदरकर यांनी सांगितले. कुणी सांगितल्यामुळे आपण हे मतदान केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधी फाटक यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.