* महापालिकेला साक्षात्कार
* ९०० कोटींचे नवे रस्ते तयार करणार
* डांबरी रस्त्यांना रामराम
* यापुढील रस्त्यांना काँक्रीटचा मुलामा
एका बाजूस डोंगर तर दुसऱ्या बाजूस खाडी यामुळे ठाणे शहरातील जमीन क्षारयुक्त झाल्याने डांबरी रस्ते या भागात फार काळ टिकू शकत नाहीत, असा साक्षात्कार ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागास झाला आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी शहरातील वेगवेगळ्या भागात डांबरी रस्ते उभारण्यासाठी सुमारे २४७ कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतर यापुढे डांबरी रस्ते टिकणार नाहीत, असा जावईशोध महापालिकेतील वरिष्ठ अभियंत्यांनी लावला आहे. विशेष म्हणजे, डांबरी रस्ते टिकणार नसतील तर यापुढे केवळ काँक्रीटचे रस्ते उभारायचे, असा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी उभारण्यासाठी कंत्राटदारांना कामाची ५० टक्के रक्कम आधी द्यायची आणि पुढील तीन वर्षांनंतर दोन टक्के चक्रवाढ व्याजाने उर्वरित रक्कम (डिफर्ड पेमेन्ट) अदा करायची, असा नवा फॉम्र्यूला ठरविण्यात आला असून डांबरी रस्त्यांवर यापूर्वी केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चाचे काय झाले, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शरपंजरी पडणारे रस्ते ठाणेकरांना नवे नाहीत. स्थापनेपासून आतापर्यंत ठाण्यातील रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत, असे एकही वर्ष ठाणेकरांनी अनुभवलेले नाही. डांबरी रस्त्यांवर वारंवार खड्डे का पडतात हे काही लपून राहिलेले नाही. महापालिकेतील राजकारणी, अभियंते आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीच्या सुरस कहाण्या यापूर्वीही महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात चíचल्या गेल्या आहेत. असे असले तरी वारंवार पडणाऱ्या या खड्डय़ांना ठाण्यातील क्षारयुक्त जमीन जबाबदार असल्याचा नवा शोध महापालिकेतील अभियंत्यांनी लावला आहे. डांबरी रस्त्यांच्या कामांचा दर्जा, पाण्याचा निचरा होण्याची सदोष व्यवस्था, कामावर होणारी देखरेख असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारत क्षारयुक्त जमिनीमुळे डांबरी रस्ते टिकूच शकत नाहीत, असा साक्षात्कार महापालिकेस झाला असून त्यावर उपाय म्हणून काँक्रीटचे रस्ते उभारायचे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
९०० कोटींचा नवा दौलतजादा
ठाणे महापालिकेचे क्षेत्र कोकण परिसरात येत असून या ठिकाणी डोंगर तसेच खाडीचा भाग येत असल्याने येथील जमीन क्षारयुक्त आहे. तसेच भूमिगत पाण्याची पातळी जमिनीपासून जवळच आहे. त्यामुळेच ठाण्यात डांबरी रस्ते दीर्घ काळ टिकत नाहीत, असे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने प्रकल्प अहवालात म्हटले आहे. कोटय़वधी रुपये खर्चून डांबरी रस्ते तयार करण्यात येतात, पण पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडतात. डांबरी रस्त्यांचे आयुष्यमान कमी असते आणि त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही दिवसेंदिवस वाढू लागला आहे. खड्डय़ांमुळे अपघात आणि नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळेच उशिरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने दीर्घ काळ टिकणारे रस्ते तयार करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशा या रस्त्यांवर ९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
नव्या पद्धतीचे रस्ते
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीअंतर्गत येणारे २९५ रस्ते सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने करण्यासंबंधीचा जम्बो प्रकल्प महापालिका प्रशासनाने तयार केला असून त्यासाठी ९७०.३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ३१.१५ कोटी रुपये पुढील पाच वर्षे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी असणार आहेत. डिफर्ड पेमेंट पद्धतीनुसार प्रस्तावित नियुक्त निविदाकारास देयकातील रकमेपैकी ५० टक्के रक्कम सुरुवातीला देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम तीन वर्षांनी त्या काळातील प्राइम लेंडिंग रेट अधिक दोन टक्के याप्रमाणे चक्रवाढ व्याजासह देण्यात येणार आहेत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या काळात महापालिकेने नुकतेच २४८ कोटी रुपयांचा खर्च करून डांबरी रस्ते तयार केले आहेत. हे रस्ते तयार करताना ठाण्याची जमीन क्षारयुक्त असल्याचा शोध लागला नव्हता का, असा सवाल महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.