ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या पुढाकाराने येत्या गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नळपाडा येथे निवडण्यात आलेल्या मैदानाचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापौरांच्या प्रभागातील एका खासगी विकासकाच्या मालकीच्या भूखंडावर ही स्पर्धा भरवली जात असून काल-परवापर्यंत दुरवस्थेत असलेल्या या भूखंडांची भरणी, सपाटीकरण, सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीची अनेक मैदाने शहरात असताना एका खासगी विकासकाच्या जमिनीवर या स्पर्धा भरविण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा सवाल आता उपस्थित होत असून महापौरांच्या प्रभागात सुरू असलेल्या या दौलतजाद्याकडे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनीही डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. मॅरेथॉन, कबड्डी तसेच खो-खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आघाडीवर राहिलेल्या ठाणे महापालिकेच्या या स्पर्धाना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. ठाणे पूर्वेकडील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यापूर्वी अशा प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असे. मात्र, पश्चिमेकडील रहिवाशांनाही या स्पर्धाचा लाभ घेता यावा यासाठी इतर ठिकाणीही अशा स्वरूपाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली. ठाणे पश्चिमेकडील मनोरुग्णालयालगत असलेल्या क्रीडा संकुलात काही महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धाना ठाणेकरांचा तुफान प्रतिसाद लाभला होता.  महापालिकेच्या मालकीच्या मैदानांवर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धाना अतिशय तुफान प्रतिसाद मिळत असताना ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी नळपाडा येथील स्वत:च्या प्रभागातील एका खासगी भूखंडावर महापौर चषक खो-खो स्पर्धाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.
नळपाडा भागातील अतिशय गलिच्छ वस्तीस लागून असलेल्या एका भूखंडावर ही स्पर्धा भरविण्यात येणार आहे. याच भागात ग्रीनवूड या खासगी विकासकाच्या अखत्यारीत येणारा एक भला मोठा भूखंड आहे. या भूखंडावर महापालिकेचे कोणतेही आरक्षण नाही. भूखंडाच्या चहूबाजूचा परिसर झोपडपट्टय़ांनी वेढला आहे. या खासगी भूखंडाची अवस्था काही दिवसांपूर्वीपर्यंत अतिशय दयनीय बनली होती. त्यावर महापालिकेने तब्बल सहा लाख रुपयांचा खर्च करून भराव टाकला. भरावाचे सपाटीकरण केले. मैदानात आत जाण्यासाठी १०० मीटर लांबीचा एक डांबरी रस्ता तयार केला. ही स्पर्धा आटोपल्यानंतर ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित होण्याची शक्यता सध्या तरी नाही. असे असताना खासगी विकसकाच्या मालकीच्या भूखंडावर खर्च करून त्यावर स्पर्धा भरविण्याचा महापौरांचा अट्टहास कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेच्या मालकीच्या मैदानांवर स्पर्धेचे आयोजन केले असते तर त्यासाठी खर्चही कमी झाला असता. दरम्यान, हे मैदान ठाणे रेल्वे स्थानकापासून लांब असल्याने तेथे पोहोचण्यासाठी खेळाडूंना त्रासाचे होणार आहे. याशिवाय रात्रीच्या वेळेत आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी महिला खेळाडू मोठय़ा संख्येने येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा असणार आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील सूत्रांनी दिली.
शहरातील सर्वच भागात स्पर्धाचे आयोजन करणे आवश्यक असून त्यामुळेच नळपाडा परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  हा भूखंड खासगी असला तरी ही जागा अनेक वर्षांपासून ओसाड आहे. या ओसाड जागेवर मुले खेळतात. त्यामुळे ओसाड जागेचा विकास केला गेल्याने स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.या जागेच्या मालकीविषयी काही वाद आहेत. त्यामुळे बिल्डरचे चांगभलं करण्यासाठी भूखंडाचा विकास होतो आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.
महापौर हरिश्चंद्र पाटील