कोणत्याही निमंत्रणाशिवाय केवळ पंढरीतील पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखोंच्या संख्यने पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत रुजू होण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचे एक पथक रुजू होणार आहे. कोकण मानवसेवा प्रतिष्ठान आणि ठाणे जिल्हा वैद्यकीय प्रतिनिधी या दोन संस्था गेली २३ वर्षे हा उपक्रम राबवीत आहेत. यंदा १ ते ११ जुलै दरम्यान सासवड ते पंढरपूर या मार्गावर हे डॉक्टरांचे पथक विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणार असून वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला पायी येतात. धूळ, हवा-पाण्यातील बदल आणि सततच्या चालण्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचा गट वारीमध्ये सहभागी होत असतो. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हे पथक वारीत जात असल्याने वारकऱ्यांनाही त्यांचा चांगला परिचय झाला आहे. ठाणे जिल्हा वैद्यकीय प्रतिनिधी संघटनचे अध्यक्ष पी.जी.पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक वारीमध्ये दाखल होते.
 यामध्ये डॉ. डी.जी.पंडित, डॉ. ओमप्रकाश शुक्ला, डॉ. राजेन नायर, डॉ. सुनील नलावडे, डॉ. संजीव पवार, डॉ. धनंजय दांगट, डॉ. विवेक लोलगे, डॉ. ए. एल. पाटील हे सर्व डॉक्टर वारकऱ्यांची तपासणी आणि औषधांचा पुरवठा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रवीण ठाकूर, राहुल पवार, प्रसाद देशपांडे, किशोर पवार, गणपत कदम, संजय धनावडे, अमित पवार, सुभाष सोनावणे, व हेमंत पवार या कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल.            
वारीच्या काळात वारकऱ्यांना अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार उद्भवतात. त्यांच्यासाठी वेदनाशामक औषधे, पाण्यामुळे डायरीयासारखे विकार उद्भवत असल्याने उलटी जुलाबाची औषधे, अशक्तपणा येणाऱ्या वारक ऱ्यांसाठी सलाइन्स, ग्लुकोज पावडर, डोळ्याचे संसर्ग, खोकला, अस्थमा, ताप अशा आजारांची उपचार व्यवस्था या शिबिरांमध्ये असते. वारीच्या मार्गावर तंबू ठोकून ही डॉक्टरमंडळी रुग्णसेवा करतात. या डॉक्टरांसोबत दोन अ‍ॅम्ब्युलन्स, दोन औषधांचे आणि साहित्याचे ट्रक्स व एक डॉक्टरांची बस असा सगळा या शिबिराचा अवाका असतो. स्त्री रोगतज्ज्ञ ते विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर्स या शिबिरामध्ये सहभागी होतात, अशी माहिती पी.जी.पवार यांनी दिली.