ठाणे, डोंबिवली, दिवा स्थानकांतील फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करताना रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडू लागल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांमध्ये डेरा टाकून बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून निघणारा लाखो रुपयांचा हप्त्याचा धूर सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणू लागला आहे. सर्वसामान्य प्रवासी, संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतरही ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये फेरीवाल्यांच्या संख्येत दररोज शेकडय़ांनी भर पडू लागली आहे. कल्याण, डोंबिवलीसारखी मोठय़ा गर्दीची स्थानके तर फेरीवाल्यांनी अक्षरश: फुलून गेली आहेत. या फेरीवाल्यांना नेमके कुणाचे संरक्षण आहे हे गुपित आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमुळे उघड होऊ लागले असून एकटय़ा डोंबिवली स्थानकात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून महिन्याला काही लाखांच्या घरात हप्ता निघत असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे.   
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी रेल्वे सुरक्षा दलाला फेरीवाले हटवण्यासाठी दिलेल्या आदेशांना सुरक्षा यंत्रणांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र ठाण्यासह पल्याडच्या जवळपास सर्वच स्थानकांमध्ये दिसते. रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई थंड पडल्यामुळे फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. मध्यंतरी एका दौऱ्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी फेरीवाल्यांना पोलिसांचा आशीर्वाद असतो, असा जाहीर आरोप निगम यांच्यापुढे केला. त्यानंतर खासदारांनी दिलेल्या ‘स्टाइलबाज’ आंदोलनाच्या धमकीलाही फेरीवाल्यांनी भीक घातली नसून त्यांचे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या पाठिंब्यामुळे फेरीवाल्यांसाठी हे ‘अच्छे दिन’ आले असून फेरीवाल्यांचा उपद्रव प्रत्येक स्थानकात वाढू लागला आहे. ठाण्यापासून कर्जत आणि कसाऱ्यापर्यंत रेल्वे स्थानक परिसर आणि लोकल डब्यात फेरीवाल्यांचा उच्छाद प्रवाशांची डोकेदुखी वाढवणारा असून त्यांच्यावर कारवाई का नाही, असा संतप्त सवाल प्रवासी संघटना विचारत आहेत.
ठाण्यातील सॅटिस प्रकल्पाच्या आसऱ्याने वाढलेले फेरीवाले, कल्याणच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांची बाजारपेठ, डोंबिवली स्थानकासभोवतालचा फेरीवाल्यांचा कोंडाळा प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ करणारा ठरतो आहे. या भागातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे सुरक्षा दलाला वारंवार आदेश देण्यात येतात. मात्र सुरक्षा दल या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करते. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापासून ते लोकलच्या डब्यांपर्यंत सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून या फेरीवाल्यांचे ‘लोकल’ मार्केट विकसित झाले आहे. हे मार्केट वसवण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचा हातभार मोठा असून त्यांच्या पाठिंब्यावर फेरीवाल्यांचा पसारा वाढू लागला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये आढळणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये शहाड, ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा, कळवा या भागात राहणाऱ्या उत्तरभारतीय फेरीवाल्यांची मोठी संख्या आहे. तर भिवंडी, मिराभाईंदर या भागातूनही फेरीवाले ठाणे, कल्याणमध्ये व्यवसाय करण्यासाठी दाखल होतात. फेरीवाल्यांमध्ये स्थानिकांचे प्रमाण अत्यल्प असून फेरीवाल्यांनी आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले आहेत. ५ ते १५ जणांच्या गटागटाने हे फेरीवाले व्यवसायाला सुरुवात करत असून एकत्र राहिल्याने प्रवाशांवर दादागिरी करणे त्यांना सोपे जाते.
येथे केवळ ‘खाकी राज’
मोठी स्थानके वगळता छोटय़ा स्थानकांमध्ये सकाळच्या वेळेत रेल्वेचे व्यवस्थापक कार्यरत असतात. त्यांच्याकडे केवळ प्रशासकीय कामाचा भार असल्याने फेरीवाल्यांच्या व अन्य समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो. तर संध्याकाळी ६ नंतर रेल्वेचे अधिकारी गेल्यानंतर छोटय़ा स्थानकांमध्ये ‘खाकी राज्य’ सुरू होते. सुरक्षा यंत्रणेला हप्ते द्या आणि कोणत्याही ठिकाणी व्यवसाय करा, असा या खाकी राज्याचा अलिखित नियम असतो. या हप्त्याचे स्वरूप ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत असतो. शिवाय व्यावसायाचे ठिकाण, व्यवसायाचे स्वरूप यावर हप्त्यांची रक्कम ठरत असते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांकडून लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर यासंबंधीच्या अनेक सुरस कहाण्या पुढे येऊ लागल्या आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्यासाठी साडेआठ हजारांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी पाच हजारांची लाच स्वीकारताना रेल्वे पोलीस नाईक कबीर कमरुद्दीन पिरजादे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तीन दिवसांपूर्वी रंगेहाथ अटक केली. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवा स्थानकात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्या विद्युलता बारामतीकर या ठाणे रेल्वे पोलिसातील महिला पोलीसालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. डोंबिवली स्थानकातून फेरीवाला हप्त्याचा सर्वाधिक धूर निघत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाणे, कल्याण स्थानकातही फेरीवाल्यांना अभय देण्यासाठी मोठे दरपत्रक तयार असते, असे सूत्रांनी सांगितले.