गणेशोत्सवा निमित्ताने कल्याणचा फूल बाजार बहरला असून यंदा पावसाळा लांबल्याने फुलांची आवक मात्र घटल्याचे चित्र आहे. आवक घटल्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांच्या किमती चढल्या आहेत. नाशिक, पुणे आणि अहमदनगरहून प्रत्येक दिवशी सुमारे २२ टन फुलांची आवक होत असून गुरुवारी ही आवक २५ टनांच्या पुढे होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांची आवक घटली असली तरी किमती मात्र चढलेल्याच असल्याने गणेश भक्तांच्या खिशाला चाट पडत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची फुलाची एकूण उलाढाल सुमारे एक कोटीहून अधिक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेल्या पाच दिवसांपासून कल्याणच्या फूल बाजारामध्ये पिवळा, भगवा, कलकत्ता झेंडू तसेच कापरी गोंडा, शेवंती, गुलछडी, गुलाब, जरबेरा, आर्किट आणि अष्टर या विविध जातींच्या फुलांची मोठी आवक होत आहे. दादरनंतर फुलांचे मोठे मार्केट कल्याणमध्ये असल्याने या बाजारामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागातून मोठय़ा प्रमाणात घाऊक विक्रेते आणि सामान्य खरेदीदार गर्दी करत आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सामान्य खरेदीदारांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे येथील फूलविक्रेते जयसिंग कुलट यांनी दिली. मात्र मोठी सार्वजनिक मंडळे आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या मागण्या प्रत्येक दिवशी नोंदवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
फुलांच्या किमती वाढलेल्या..
पावसाच्या लहरीपणाचा फटका फूल मार्केटला बसला असून त्यामुळे यंदा तुलनेने कमी माल आल्याचे चित्र आहे. मात्र आलेल्या मालाला मोठी किंमत मिळत असल्याने व्यापारी तसेच शेतक ऱ्यांमध्ये उत्साहाचे वातवरण आहे. वाढलेला वाहतूक खर्चामुळे सामान्य गणेश भक्तांना मागील वर्षांच्या तुलनेत २० ते ३० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2014 1:30 am