सातत्याने वेळापत्रकाची साथ सोडून धावणाऱ्या लोकल गाडय़ा, आठवडय़ातून एकदा तरी तुटणाऱ्या ओव्हरहेड वायर आणि महिन्यातून एकदा तरी बिघडणारी सिग्नल यंत्रणा यांमुळे मेटाकुटीला आलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांवरील ‘छत्र’ही रेल्वेने हिरावून घेतले आहे. मध्य रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील छप्पर विविध कारणांसाठी काढण्यात आल्याने प्रवाशांना उन्हापावसाचा मारा चुकवत गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
ठाणे स्थानकात सरकते जिने बसवण्यासाठी आणि नवा पूल बांधण्यासाठी रेल्वेने प्रवाशांच्या डोक्यावरील छत्र हिरावून घेतले होते. या गोष्टीला आता तब्बल एक-दीड वर्ष उलटून गेले, पूल तयार झाला, तरीही रेल्वेने हे छप्पर पुन्हा घालण्याची तसदी घेतलेली नाही. प्लॅटफॉर्म तीन-चारवरील सरकते जिने सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरीही त्या प्लॅटफॉर्मवर अद्याप छप्पर बसलेले नाही.
कुर्ला स्थानकात तर मुंबईच्या दिशेच्या पुलाचा विस्तार करण्यासाठी तेथील छप्पर असेच दीड वर्ष उडवले आहे. येथे ठाण्यापेक्षा अधिक भाग उघडय़ावर आला आहे. हार्बर व मुख्य मार्ग एकत्र येणाऱ्या या स्थानकात प्रवाशांची गर्दीही चांगलीच असते. मात्र रेल्वेने अद्याप तरी तेथे कोणतेही विस्तारीकरण किंवा रूंदीकरण असे काम सुरू केलेले नाही.
त्याशिवाय कळवा, मुलुंड, भांडूप, ठाणे येथे १५ डबा गाडय़ांच्या अंदाजाने प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात आला. मात्र या ठिकाणीही रेल्वेने अद्याप छप्पर टाकलेले नाही. या गाडय़ांची सेवा दिवसातून फक्त ३-४ वेळा असली, तरी त्या वेळेत गाडी येईपर्यंत प्रवाशांना उन्हापावसात ताटकळत बसावे लागते.
ठाण्यातील सरकत्या जिन्यांच्या बाजूला पुढील दहा दिवसांत छप्पर टाकण्यात येणार आहे. मात्र इतर प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसेपर्यंत छप्पर टाकणे शक्य होणार नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. इतर प्लॅटफॉर्मवर छप्पर टाकून प्रवाशांना ‘छत्रछाया’ देण्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रवाशांच्या डोक्यावरील छत्र घालविण्यात पश्चिम रेल्वेही मागे नाही. पश्चिम रेल्वेवर दादरपासून पुढे अनेक स्थानकांवरील पत्रे गायब आहेत. अंधेरी स्थानकात हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे मोठे काम चालू आहे. त्या नावाखाली पत्रे काढण्यात आले आहेत. जोगेश्वरीला मुळातच बराच मोठा भाग उघडाच आहे. तर गोरेगाव स्थानकातही अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवरच खोदून ठेवले असून तेथील पत्रेही काढण्यात आले आहेत. भर पावसात गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना भिजत तिष्ठत तेथे उभे राहावे लागते.