ठाणे रेल्वेस्थानकातून कर्जत तसेच कसारा मार्गावर लोकल गाडय़ांच्या ३२ फेऱ्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर सातच फेऱ्या सुरू असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच अर्थसंकल्पातील घोषणांची पूर्तता केव्हा होणार, असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित होऊ लागला आहे. कल्याण स्थानकातून शटलच्या माध्यमातून कर्जत व कसारासाठी तीन फेऱ्या सुरू केल्या असून त्या सकाळच्या वेळेत असल्याने त्याचा प्रवासी वर्गाला काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नव्या घोषणा करण्याऐवजी जुन्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष द्यावे, असा टोला प्रवासी संघटनांनी लगावला आहे.
ठाणे स्थानकातून कल्याण, कसारा, कर्जत, आसनगाव, अंबरनाथ, बदलापूर या मार्गावर लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मुंबईतून प्रवाशांनी भरून आलेल्या लोकलमधून त्यांना प्रवेश करणे शक्य होत नाही. तसेच ठाण्याच्या दिशेनेही त्यांना अशाच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच ठाणे स्थानकातून कर्जत कसाऱ्याकडे जाणाऱ्या शटलची मागणी पुढे येऊ लागली होती. तसेच शटलच्या किमान फेऱ्या तरी सुरू व्हाव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. असे असतानाच तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाण्यातून ३२ लोकल धावतील, अशी घोषणा केल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, काही दिवसांतच आश्वासने हवेत विरली आणि परिस्थिती ‘जैसे थे’च झाली. या संदर्भात, प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेताच सुमारे दोन वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाने शटलच्या सात फेऱ्या सुरू केल्या. त्यामध्ये कसारा, आसनगाव प्रत्येकी एक, बदलापूर तीन, तर अंबरनाथला जाणाऱ्या दोन लोकलचा समावेश होता.
ठाणे स्थानकातून गर्दीच्या वेळेत सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण सकाळच्या वेळेत याच फेऱ्यांना प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. नवी मुंबईहून मोठय़ा संख्येने प्रवासी ठाणे स्थानकात येत असून त्यांचाही याच लोकलच्या फेऱ्यांकडे जास्त ओढा असल्याचे दिसून येते. दरम्यान, या फेऱ्या वाढवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवाशांच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबईमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या संसदीय समितीसमोरदेखील प्रवाशांनी आपली ही व्यथा मांडली होती, अशी माहिती कल्याण-कसारा प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी सांगितले.
कल्याण शटल कागदावरच..
ठाण्याच्या धर्तीवर कल्याण स्थानकातून शटल सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी मार्चमध्ये सकाळच्या वेळेत केवळ तीन फेऱ्या कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत मार्गावर रेल्वेने सुरू केल्या. मात्र ऐन गर्दीच्या वेळी कल्याण स्थानकातून एकही शटल धावत नसल्याने त्याचा कोणताच फायदा प्रवाशांना होत नाही.
घोषणांपेक्षा सेवा द्या
ठाणे स्थानकातून दररोज सहा लाख प्रवासी ये-जा करीत असल्याचे रेल्वेने एका अहवालातून जाहीर केले आहे. याच स्थानकातून कल्याणकडे जाण्याऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाढविण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केलेल्या घोषणादेखील पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय घोषणांवर आम्ही यापुढे विश्वास का ठेवावा?
– नंदकुमार देशमुख,
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.