आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) च्या पाच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवारांनी व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचे उंबरठे गेले काही दिवस झिजवले आहेत. यात शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राजन विचारे आघाडीवर असून त्यांच्या तर तीन प्रचार फेऱ्या बाजारात आतापर्यंत झालेल्या आहेत.
फळ, भाजी, कांदा बाजारातील राष्ट्रवादीची व्होट बँक फोडण्यासाठी महायुतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्तादेखील वापरून पाहिला आहे. एपीएमसी बाजारातील माथाडी, मापाडी, फळ, भाजी, कांदा बटाटा येथील व्यापारी व कामगार हे राष्ट्रवादीचे तर मसाला आणि अन्नधान्य बाजारातील व्यापारी हे भाजपाची व्होट बॅक मानली जात आहे. मुंबईनंतर सर्वाधिक गुजराती समाज हा नवी मुंबईत राहात आहे. ९० च्या दशकात मुंबईतील मसाला आणि धान्य बाजार नवी मुंबईत स्थलांतरित झाला. त्याबरोबर तेथील व्यापारी, त्यांच्या दुकानात काम करणारे कामगारदेखील नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली भागात राहण्यास आले. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली मार्गावर आजही एपीएमसीतून खासगी बस वाहतूक चालत आहे. हा सर्व मतदार भाजपाला मानणारा असला तरी शिवसेना हा गुंडांचा पक्ष त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता इतर पक्षांना करीत आल्याचे ठाणे लोकसभा मतदारसंघात दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या भागातून नेहमीच मताधिक्य मिळाले आहे. पण आता मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी गुजराती समाज एकटवला असून शिवसेनेच्या उमेदवारालाही मतदान करण्याची खूनगाठ त्याने मनाशी बांधली आहे. त्यात राज्य सरकाराने लागू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला एपीएमसीतील व्यापाऱ्यांचा विरोध आहे.
केंद्र सरकारच्या वतीने थेट परकीय गुतंवणुकीला (एफडीआय) हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. पण व्यापाऱ्यांनी त्याला लाल झेंडा दाखविला आहे. त्यामुळे दोन्ही सरकार बरोबर या व्यापाऱ्यांचा संघर्ष गेली कित्येक महिने सुरू आहे. त्यात भाजपने एफडीआयला किरकोळ क्षेत्रात शिरकाव करण्यास नकार देण्याचा शब्द व्यापाऱ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एलबीटीला टाळा मारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी महायुतीच्या उमेदवारांवर खूष आहेत. त्यात मसाला व धान्य बाजारात असणारी बहुसंख्या गुजराती तर अब की बार मोदी सरकारचा नारा घराघरांतून पोहचविण्यास उत्सुक झाले आहेत. त्यामुळे ही हक्काची व्होट बँक यावेळी कॅश करता यावी म्हणून राजन विचारे यांच्या जास्तीत जास्त प्रचार सभा एपीएमसी बाजारात होत आहेत.
नवी मुंबई हा पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने व्यापाऱ्याचे हे मतदान राष्ट्रवादीला होत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. पण अब की बारचा मंत्र गुजराती समाजाने मनावर बिंबवला असल्याने मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी हा समाज शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याची भीती राष्ट्रवादीत आहे. त्यामुळेच नाईक यांनी बाजार आणि बिल्डर असोशिएशनच्या प्रमुख सदस्यांबरोबर नुकतीच बैठक घेतली. त्यात संजीव नाईक अर्थात नवी मुंबईत झालेल्या विकासाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.