News Flash

मॉल बाजार ; ग्राहक मिळविण्यासाठी रिक्षाचालकांना ऑफर..!

दिवाळी जवळ आल्याने खरेदीचा हंगाम सध्या तेजीत येऊ लागला आहे. मात्र अपुऱ्या रिक्षा आणि बेभरवशाच्या शहर परिवहन सेवेमुळे ग्राहक जवळच्या दुकानामधून अथवा थेट ऑनलाइन खरेदी

| October 16, 2014 02:11 am

दिवाळी जवळ आल्याने खरेदीचा हंगाम सध्या तेजीत येऊ लागला आहे. मात्र अपुऱ्या रिक्षा आणि बेभरवशाच्या शहर परिवहन सेवेमुळे ग्राहक जवळच्या दुकानामधून अथवा थेट ऑनलाइन खरेदी करणे पसंत करू लागले आहेत. ग्राहकांच्या या मानसिकतेचा ठाणे शहरातील विशेषत: घोडबंदर रोडवरील नव्या मॉल संस्कृतीला फटका बसू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल व्यवस्थापक निरनिराळ्या क्लृप्त्या लढवीत आहेत. गेल्या वर्षी ठाणे महापालिका परिवहन सेवेचा खास रिंगरूट मॉल खरेदीसाठी आखण्यात आला होता. यंदा तर त्यांनी त्यापुढे जात थेट रिक्षाचालकांशीच हातमिळवणी केली आहे.
ठाणे शहरात रिक्षाचालक भाडे नाकारीत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच आता मॉलमधील रिक्षा स्थानकाला चालक फारसा प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे विवियाना मॉल व्यवस्थापनाने यंदा नवी योजना आणली असून त्या माध्यमातून रिक्षाचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसून येते. ‘महिन्यातून साठ वेळा मॉलबाहेरील रिक्षा स्थानकातून प्रवाशांची वाहतूक करा आणि दोन हजार रुपयांचा किराणा बाजार मोफत घेऊन जा.’, अशी योजना विवियाना मॉल व्यवस्थापनाने सुरू केली असून त्यासाठी रिक्षाचालकांना पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात मोठ-मोठे मॉल उभे राहिले असून या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी मॉल व्यवस्थापनाने विशेष रिक्षास्थानक उभारले आहेत. मात्र मॉलमधील रिक्षास्थानकाला चालक फारसा प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागते. मॉलमधील स्थानकातून रिक्षा मिळत नसल्याने ग्राहक वर्ग कमी होऊ शकतो, अशी भीती मॉल व्यवस्थापनाला वाटू लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर मॉलमधील स्थानकात रिक्षांची संख्या वाढावी आणि ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी विवियाना मॉल व्यवस्थापनाने रिक्षाचालकांना आकर्षित करण्यासाठी नवी योजना सुरू केली आहे.
योजनेची जाहिरातबाजी
विवियाना मॉलच्या रिक्षास्थानकातून प्रत्येक महिन्याला ६० हून अधिक वेळा प्रवाशांची वाहतूक करा आणि दोन हजार रुपयांचा किराणा बाजार मोफत घेऊन जा. तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक वेळी प्रवाशाला बसवायचे आणि सुरक्षारक्षकाकडून कुपन घेऊन जायचे, अशी अट घालण्यात आली आहे. या  योजनेसाठी ‘बार बार आओ.. हर महिने ६० बार आओ, दो हजार तक का किराना फ्री ले जाओ!.’ असे पत्रक विवियाना मॉल व्यवस्थापनाने तयार केले असून रिक्षाचालकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:11 am

Web Title: thane mall ties up with rickshaws to attract customers
टॅग : Customers
Next Stories
1 आता कल्याणमध्येही ‘वेध’
2 चला, मतदान करू या!
3 प्रचाराच्या बॅनरबाजीमुळे डोंबिवली विद्रूप
Just Now!
X