ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा पुरता खेळखंडोबा झाल्याने नव्या कामांना मंजुरी देण्यात काय अर्थ, असा सवाल उपस्थित करत बुधवारी स्थायी समिती सभेत प्रशासनाने मांडलेले सर्व महत्वाचे प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना तसेच अर्थसंकल्पाचे नियोजन नसताना स्थायी समिती सभेत कोटय़वधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मांडलेच कसे जातात, असा सवालही उपस्थित झाला आहे.  
ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त असीम गुप्ता यांनी तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सुमारे २१०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपयांची वाढ करत महापौर संजय मोरे यांनी अर्थसंकल्पाचा अंतिम मसुदा प्रशासनाला सादर केल्याने जमा-खर्चाचे गणित जमवायचे कसे, असा सवाल प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या ठोस तरतूदींशिवाय महापालिकेचे कामकाज सुरू असून नेमका हाच मुद्दा घेत बुधवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पात वाढीव खर्चाची नोंद करण्यात आली नव्हती, अशी स्पष्ट कबुली प्रशासनाने दिली. वेगवेगळ्या विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली तरी महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे मंजुर प्रस्तावातील कामे प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. असे अनेक मुद्दे उपस्थित करत या बैठकीत सदस्यांनी एकाही विषयाला मंजुरी दिली नाही.