ठाणे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी जुंपण्यात आल्याने मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील रिकाम्या खुच्र्या पाहून माघारी परतावे लागत आहे. प्रभागातील नागरी सुविधांसंबंधीच्या तक्रारी घेऊन अनेक रहिवाशी प्रभाग कार्यालयांमध्ये खेटे घालत असतात. मात्र, या तक्रारींना दाद देण्यासाठी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा भासू लागली आहे. निवडणुकीच्या व्यस्त कामकाजातून अधिकारी-कर्मचाऱ्यांची महिनाभरानंतरच सुटका होणार आहे. त्यामुळे आपल्या कामांचा निपटारा लावण्यासाठी रहिवाशांना दिवाळीची वाट पाहावी लागणार आहे.
निवडणुकांच्या कामासाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामे सोपविण्यात येतात. यासंबंधीचा रीतसर आदेश काढून कर्मचाऱ्यांची रवानगी निवडणूक कामासाठी केली जाते. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून शिपाई पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे विभागून देण्यात येतात. नवीन मतदाराची नोंदणी, मतदारांच्या नावात बदल, मतदार यादीतील त्रुटी, मतदारांची यादी तयार करणे, मतदान पावतीचे वाटप, अशा स्वरूपाची कामे त्यांना सोपविण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या कामाकाजासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यंदाही जुंपण्यात आले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हा निवडणूक विभागाचे निघणाऱ्या आदेशाप्रमाणे निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत असून त्यामध्ये महापालिकेतील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यालयासह सर्वच विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच प्रभाग समितीमधील अध्र्याहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यालय आणि प्रभाग समितीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खुच्र्या रिकाम्या असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसू लागले आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील सुमारे ९० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी अजूनपर्यंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा इतका फौजफाटा निवडणूक कामासाठी जुंपण्यात आलेला नाही.