मुंब्रा-पनवेल रोडवरील डायघर गावात ‘एस. एन्स-४’ या बारच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बुधवारी रात्री कारवाई करून उघड केल्यामुळे ठाणे पोलीस चांगलेच गोत्यात आले असून त्यांच्या कार्यपद्धतीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर खडबडून जागे झालेले ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी गुरुवारी या घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगताप यांच्यासह तिघांना दोषी ठरून त्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यामुळे मुंबई पोलिसांची कारवाई ठाणे पोलिसांना महागात पडल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मुंब्रा-पनवेल रोडवरील डायघर गावात असलेल्या ‘एस. एन्स -४ ’ या बारमध्ये कुंटणखाना चालविण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्याआधारे बुधवारी रात्री समाजसेवा शाखेच्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून बारमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची खात्री केली आणि बारवर धाड टाकली. या धाडीत सुमारे ५५ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या घटनेप्रकरणी बार व्यवस्थापक, वेटर, वॉचमन, बारमन, डीजे चालक, अशा एकूण १४ आरोपींविरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारमधून वेश्या व्यवसायाकरिता मुली तसेच महिलांना पुरविण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे हा बार वेश्या व्यवसायाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
डायघर पोलिसांनी यापूर्वी या बारवर धाड टाकून त्याचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द केला होता. पण, त्याविरोधात बारमालकाने न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, न्यायालयानेही त्याची याचिका नुकतीच फेटाळून लावली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. असे असतानाही बारमध्ये बिनधास्तपणे असा प्रकार सुरू असतानाही डायघर पोलिसांचे साधे त्याकडे लक्षही गेले नाही, याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे डायघर पोलीस चांगलेच अडचणीत आले असून या घटनेप्रकरणी पोलीस आयुक्त रघुवंशी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगताप, महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे आणि पोलीस नाईक विजय भोरसे, या तिघांना दोषी ठरविले असून त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.