लोकसभा निवडणुकीत दहशत माजविण्यासाठी गुंडापुंडांचा वापर होऊ नये, तसेच या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुंडापुंडांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. ग्रामीण भागातील ५२ गुंडापुंडांना तडीपार करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यापैकी १५ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. उर्वरित २१ गुंडापुंडांना येत्या दहा दिवसांत तडीपार करण्याची योजना ग्रामीण पोलिसांनी हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारीचे नवे जग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसई, विरार, नालासोपारा आणि मीरा-भाइंदर या भागातील सर्वाधिक गुंडापुंडांचा तडीपारीच्या प्रस्तावात समावेश आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत ही शहरे ग्रामीण पोलिसांच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील
शहरी भाग वगळून ग्रामीण परिसर आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण परिसर येतो. या दोन्ही मतदारसंघांतील स्थानिक गुंडपुंड ऐन निवडणुकीत सक्रिय होऊ नये, यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी गुंडापुंडांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये वसई, विरार, नालासोपारा तसेच मीरा-भाइंदर या शहरी भागांतील गुंडापुंडांचा सर्वाधिक समावेश आहे. ऐन निवडणुकीत हे गुंडपुंड सक्रिय होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्य़ामध्ये फरार असलेल्या सुमारे ३१ आरोपींचाही पोलिसांनी शोध घेतला असून त्यामध्ये एका खुनाच्या गुन्ह्य़ात १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे, ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील ९० टक्के अधिकाऱ्यांची बदली झाली असून त्या ठिकाणी नवे अधिकारी आले आहेत. असे असतानाही या गुंडापुंडांचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक काळात कोणताही गडबड, गोंधळ निर्माण होऊ नये,
 यासाठी ग्रामीण पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत हाणामारीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. आतापर्यंत सुमारे ४ हजार ५०० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर सुमारे ३ हजार ५०० हजार जणांना नोटिसा बजावल्या आहेत. २२८३ पैकी २०२२ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रे बँका, पेट्रोलपंप, ज्वेलर्स तसेच ज्यांच्या जिवाला धोका आहे, अशांकडे आहेत. त्यामुळे ती जमा करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती राजेश प्रधान यांनी दिली.