* सुट्टीकालीन विशेष गाडय़ांना थांबा नाही
* शौचालयांची कमतरता
* नव्या वेळापत्रक फलकाचा अभाव
सरकत्या जिन्यांमुळे ठाणेकर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा दिल्याचा रेल्वे प्रशासनाचा आविर्भाव असला तरी प्रत्यक्षात ठाणे स्थानकातील असुविधांचा पाढा मागील पानांवरून पुढे सुरू आहे. अलीकडेच ठाणे स्थानकातील पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढविण्यात आली, तरीही ९३ सुट्टीकालीन विशेष गाडय़ांपैकी एकही गाडीसाठी ठाण्यात थांबा देण्यात आलेला नाही. तसेच या फलाटावर शौचालयाचा अभाव असल्याने प्रवाशांची गौरसोय होते. स्थानक अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला पूर्वी लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकाचा फलक होता. गेल्या दोन वर्षांपासून तो फलक गायब आहे. त्या ठिकाणी नवे वेळापत्रक लावण्यात आलेले नाही. ठाणे स्थानकातील अशा अनेक असुविधांविषयी प्रवासी नाराज आहेत.  
सरकते जिने कार्यान्वित होऊनही ठाणे स्थानकातील प्रवाशांची कोंडी कमी झालेली नाही. अरुंद जिने आणि पुलांवर सकाळ-संध्याकाळी प्रवाशांची गर्दी होते. दोन नंबरच्या फलाटावर अत्याधुनिक प्रसाधनगृहाचे भूमिपूजन होऊन आता बरेच महिने झाले तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. ते केव्हा सुरू होणार, असा प्रवाशांचा सवाल आहे. नवीन बुकिंग कार्यालयाला भिकारी आणि फेरीवाल्यांचा वेढा असतो. त्यांच्यातून वाट काढत प्रवाशांना तिकीट खिडकी गाठावी लागते. तिथे त्यांना हटकविण्यासाठी कुणीही रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी नसतो. अलीकडेच रेल्वे अधिकारी आणि खासदार संजीव नाईक यांनी ठाणे स्थानकाची पाहणी केली, तेव्हा ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेने स्थानकातील या विविध समस्यांचे गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले, अशी माहिती अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.  c