ठाणे जिल्ह्य़ात नवरात्रोत्सवानिमित्त देवी आगमन मिरवणुका तसेच दांडिया रासकरिता सर्वच मंडळांनी जय्यत तयारी केली असून जिल्ह्य़ात मंगळवारी सुमारे अडीच हजार देवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच देवीच्या सुमारे एक हजार फोटोंचे पूजन आणि ९३५ ठिकाणी घट बसविण्यात येणार असून दसऱ्याचा मुहूर्त साधून सात ठिकाणी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात येणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे या पाचही परिमंडळांमध्ये सुमारे ७७८ नवरात्रोत्सव मंडळे असून या मंडळांच्या माध्यमातून देवी मूर्तीच्या आगमनाकरिता ६८३ ठिकाणी तसेच १९६ खासगी मिरवणुका निघणार आहेत. या पाचही परिमंडळांमध्ये ५७९ सार्वजनिक, तर ५४५ खासगी देवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सुमारे ५५ सार्वजनिक, तर ८६७ खासगी घट व कलश तसेच १४० सार्वजनिक, तर १२४ खासगी फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून पाच ठिकाणी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीणच्या हद्दीत ९९६ सार्वजनिक, तर ३२७ खासगी देवी मूर्तीचे आगमन होणार असून सुमारे १३ सार्वजनिक घट व कलश तसेच ७६८ सार्वजनिक, तर १० खासगी देवीच्या फोटोंचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच दोन ठिकाणी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून मंगळवारी होणाऱ्या देवी मूर्तीच्या आगमनासाठी मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकांची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. देवीच्या मिरवणुकांसाठी ढोल-ताशे, गुलाल अशी व्यवस्था मंडळांकडून करण्यात आली आहे. तसेच देवीच्या मूर्तीकरिता मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारची आरास केली असून दांडिया खेळण्यासाठी यंदाही ऑर्केस्ट्रा, बँजोची विशिष्ट व्यवस्था केली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात विशेषत: दांडियाच्या वेळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून ठाणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ६३९ पोलीस कर्मचारी तसेच १७६ महिला कर्मचारी, असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, गृहरक्षक दलाचे सुमारे सहाशे जवान, असा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शहरातील वाहतूक मार्गात बदल
ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात मोठय़ा प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्याने येथील मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. १६ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत ठाणे स्थानक येथून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (टीएमटी व एसटी बसेस) टॉवर नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने टॉवर नाका, गडकरी सर्कल, दगडी शाळा चौक, अल्मेडा चौक या पर्यायी मार्गे जातील. गडकरी सर्कलकडून टॉवर नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना वसंत हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने व टीएमटी बसेस गडकरी सर्कल-दगडी शाळा चौक मार्गे जातील. चरईकडून एदलजी रोडने टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना धोबी आळी क्रॉस येथून प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने धोबी आळी चौक, डॉ. सोनुमिया रोड, धोबी आळी मशीद, सिव्हिल हॉस्पिटल मार्गे जातील. कोर्ट नाका येथून टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुभाष पथ, जांभळी नाका, टॉवर नाका, मूस चौक, ठाणे रेल्वे स्टेशन मार्गे जातील. दगडी शाळा येथून वीर सावरकर रोड मार्गे टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. मीनाताई ठाकरे चौकातून टेंभी नाका व स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहने जीपीओ, कोर्ट नाका मार्गे जातील, असे वाहतूक शाखेने कळविले आहे.